गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाल्याने मूळ शिवसेना कुणाची? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसैनिकांसोबत सामान्य नागरिकांमध्येही संभ्रम आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. पण मूळ शिवसेना कुणाची? याबाबत राजकीय नेत्यांकडून सातत्याने वक्तव्य केली जात आहेत.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. हिंदुत्वाचे विचार घेऊन महाराष्ट्रात फिरण्यात काहीही अर्थ नाहीये, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत महाराष्ट्राचा दौरा करावा, असा खोचक टोला बावनकुळेंनी लगावला आहे. ते यवतमाळ येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
राज्यातील सत्तासंघर्षावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सध्याची शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिवसेना नाहीच, ती एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. आता उद्धव ठाकरेंकडे केवळ केवळ एक गट उरला आहे. एकनाथ शिंदे यांचीच खरी हिंदुत्वाची शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून ४० आमदार आणि १२ खासदार फुटून बाहेर कसे गेले? हे आपण बघितलं आहे. उद्धव ठाकरेंनी आपले हिंदुत्ववादी विचार सोडले आहेत. हिंदुत्ववादी विचार सोडले नसते तर ही वेळ आली नसती. मागील अडीच वर्षात हिंदुत्वाविरोधी अनेक घटना घडल्या आहेत.
हेही वाचा- “रोहित पवारांचं काय होणार? हे…” मोहित कंबोजांच्या आरोपांवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“त्यामुळे मला असं वाटतं की, उद्धव ठाकरेंनी आता हिंदुत्वाचा विचार घेऊन महाराष्ट्रात कुठेही फिरण्यात काहीही अर्थ नाही. त्यांनी थेट शरद पवारांसोबत दौरा करावा” अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान त्यांनी शरद पवारांवरही टीकास्र सोडलं आहे. “शरद पवारांचा राजकीय इतिहास बघितला तर लक्षात येईल, त्यांनी संपूर्ण आयुष्यभर तोडफोडच केली आहे. स्वत:च्या हिमतीवर त्यांनी कधीही १०० आमदार निवडून आणले नाहीत. शरद पवारांनी जेव्हा-जेव्हा सत्ता मिळवली, तेव्हा-तेव्हा तोडफोडीच्या राजकारणातूनच मिळवली” अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.