BJP Leader Chandrashekhar Bawankule Slam Shiv Sena UBT : विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीपाठोपाठ आज महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. मात्र राहुल नार्वेकरांच्या निवडणुनंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नव्हता. यावरून भाजपाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. हे शिलसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोत्या मनोवृत्तीचे जाहीर प्रदर्शन असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.
राहुल नार्वेकर यांची आज अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधी बाजूंच्या प्रमुख सदस्यांनी भाषणं केली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा एकही नेता सभागृहात उपस्थित नव्हता. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दल एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये “उबाठा गटाच्या कोत्या मनोवृत्तीचे जाहीर प्रदर्शन!” असा थेट हल्लाबोल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेनेवर केला आहे.
“संसदीय लोकशाहीमध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाला घटनात्मक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे म्हणजेच सर्व जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह म्हणजे विधानसभा आहे. या पवित्र सभागृहाच्या अध्यक्षांचा वेळोवेळी अपमान मागील अडीच वर्षात उबाठा गटाने अतिशय निंदनीय शब्दात केला”, असे बावनकुठे म्हणाले आहेत.
“आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर माननीय अध्यक्ष महोदयांचे अभिनंदन करण्यासाठी उबाठाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नव्हता, ही बाब उबाठा गटाच्या कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करते. हा अपमान केवळ विधानसभा अध्यक्षांचा नसून या राज्यातील चौदा कोटी जनतेचा अपमान आहे”, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाची ‘ही’ बाब स्वागतार्ह
उद्धव ठाकरे पक्षावर टीका करत असतानाच बावनकुळे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, “ज्या लोकांना सभागृहाच्या प्रथा, परंपरा पाळण्याची चाड नाही, ज्यांना सभागृहाचा व सभागृहाच्या अध्यक्षांचा मान ठेवण्याचे देखील भान नाही, ते पुढील काळात जनतेच्या प्रश्नांसाठी किती संवेदनशील असतील याबाबत विचार जनतेनेच केला पाहिजे. यानिमित्ताने यांना नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य होता हेच पुन्हा एकदा अधोरेखित होते. परंतु, यावेळी उबाठा सोबतच महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी हे सौजन्य दाखवत अध्यक्ष महोदयांचा गौरव करून त्यांचे अभिनंदन केले. ही खरोखरच स्वागतार्ह बाब आहे”, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे, विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये असलेला सुसंवाद हा महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणारा आहे. महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या जनतेची, जनतेच्या मताची, या जनतेचे प्रतिनिधित्व करत असलेल्या सभागृहाची आपल्याला किती किंमत आहे, हे आज उबाठा गटाने आपल्या वर्तनातून दाखवून दिले. त्यांच्या या वर्तनाचा निषेध करावा, तेवढा थोडाच आहे”, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.