भाजपाने शिंदे गटासोबत राज्यात सरकार स्थापन केल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि भाजपा यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ‘महाभारत’, ‘कंस’ आणि ‘कृष्णाचा’ दाखला देत शिवसेनेवर टीकेचे आसूड ओढले. तर आशिष शेलार यांच्या याच टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचा अभ्यास कच्चा आहे, फडणवीस धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत, असे चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान सुषमा अंधारे यांच्या प्रत्युत्तराला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जशास तसे उत्तर दिले असून शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॉयला मंत्री केलं गेलं. खरा धृतराष्ट्र कोण आहे हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
हेही वाचा >>> “देवेंद्र फडणवीस भाजपा-सेना युतीचे मुख्यमंत्री होणार,” चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान
‘पुत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं मागील अडीच वर्षात पाहिलंय. शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून ‘मर्सिडीज बॅाय’ला मंत्री केलं आणि वडील स्वतः मुख्यमंत्री बनले. पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती. शेवटी पक्षातच महाभारत घडलं,” असे चित्रा वाघ ट्विटच्या माध्यमातून म्हणाल्या. तसेच, आता तरी धृतराष्ट्रानं डोळ्यावरची पट्टी काढावी. डोळ्यासमोरील ‘अंधार’ दूर करावा, असे म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांनाही लक्ष्य केलं.
हेही वाचा >>> “पंडितजी आतापर्यंत आम्ही पाच जणांना मारलंय,” भाजपाच्या माजी आमदाराचे धक्कादायक विधान
“कित्येक घटना डोळ्यांसमोर आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत वार करण्याची एकही संधी शिवसेनेतील कंसानं आजवर सोडली नाही. आता तर भ्याडपणे पुतणा-मावशीला पुढे केलंय. अशा कितीही पुतणा मावशी अंगावर पाठवल्या तरी जनतेचा हा कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार. नुकतंच अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांनी हे लक्षात ठेवावं,” असेदेखील चित्रा वाघ म्हणाल्या.
हेही वाचा >>> “गोविंदा आरक्षणाला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करत असून त्यांनी…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं टीकास्त्र
सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या?
“मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे सध्या धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत. एक असा धृतराष्ट्र ज्याने आधी ढीगाने आरोप केले. पण आता सगळं कळत असूनही ‘बंद डोळे… बंद ओठ… बंद त्या पापण्या… आज प्रिये मी खरी प्रीत पाहिली तुझ्यात” असं म्हणणारा हा धृतराष्ट्र आहे. ईडीने आरोप केलेले सर्व लोकं आता त्यांच्याकडे आहेत. पण धृतराष्ट्र काहीच बोलत नाही. सगळ्यांना सामावून घेत आहे.” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
हेही वाचा >>> “ज्योती मेटेंना आमदार करा”, संभाजीराजे छत्रपतींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
“आशिष शेलार, किरीट सोमय्या हे सर्व शकुनी आहेत, हे शकुनी असे आहेत, जे खरं काय आहे? ते सांगत नाहीत. हेच लोकं भावना गवळी आणि प्रताप सरनाईक यांना माफिया गँग बोलत होते. भावना गवळी त्यांच्या तथाकथित महाशक्तीला राखी बांधायला जातात, ज्याने राज्यात भूकंप येऊ शकतो, हे माहीत असतानासुद्धा धृतराष्ट्र काहीच बोलत नाही. धृतराष्ट्र हा सध्या हतबल आणि सत्तातुर आहे. तो सत्तेसाठी इतका हफाफलेला आहे की, त्याला न्याय काय? अन्याय काय? सत्य काय? आणि असत्य काय? या सर्व गोष्टींचा विसर पडला आहे. त्यामुळे फडणवीस मला कृष्ण नाही तर धृतराष्ट्र वाटतात” अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली.