‘बिग बॉस’ फेम आणि अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. अशात आज ( ५ जानेवारी ) चित्रा वाघ यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना उर्फी जावेद, महिला आयोगावर हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फी जावेदचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यामध्ये एका छायाचित्रकाराने उर्फीला तुझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना काय सांगशील? असा सवाल विचारला होता. त्यावर उर्फी म्हणाली, “प्रेमाचं माहिती नाही, पण माझा नंगानाच सुरु राहणार,” असा टोला उर्फीने अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांना लगावला होता.

हेही वाचा : “उर्फीबरोबर महिला आयोगही बेफाम झालं का?” चित्रा वाघ यांचा चाकणकरांवर हल्लाबोल; म्हणाल्या, “रस्त्यावरील नंगानाच…”

यावर आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तिला अजून माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तिला आम्ही फिरू देणार नाही. तिला काय बोलायचं बोलूद्या. ही उर्फी बोलत नाहीतर, तिच्याकडून बोलवलं जात आहे. ते कोण आहेत, हे सुद्धा समोर आणणार आहे. रोजी-रोटी करण्यासाठी सुरु असलेला नंगानाच तत्काळ थांबवला पाहिजे. कसा थांबवायचा मला येतं,” असा इशारा चित्रा वाघ यांनी उर्फीला दिला आहे.

हेही वाचा : “तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली, मग उर्फीला का नाही?”, चित्रा वाघ यांचा महिला आयोगाला सवाल

“…तर पदावर बसू नका”

चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवरही टीका केली आहे. “आयोगाचं काम महिलांचा सन्मान जपणं, मान राखणं आहे. मग, उघड्या, नागड्या फिरणाऱ्यांना आयोगाला जाब विचारु वाटला नाही. कारण, त्यांना वेळ वाया घालवायचा नाही. मग, वेळ कशासाठी घालवायचा आहे. एखादी महिला मुंबईत उघडी-नागडी फिरत आहे. समाजमाध्यमांत अश्लील, घाणेरडे व्हिडीओ व्हायरल होत असताना सुमोटो दाखल करुन कारवाई का केली नाहीत. यासाठी महिला आयोगाला वेळ नसेल तर, मग त्या पदावर बसण्याचा कोणाला अधिकार नाही,” अशी टीका चित्रा वाघ यांनी चाकणकरांवर केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chitra wagh reply urfi javed over nanga nach statement ssa