राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. असं असूनही भाजपाने विजय खेचून आणला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार फुटल्याची माहिती देखील समोर येत आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. पाचवी जागा निवडून आणण्यासाठी आमच्याकडे एकही उमेदवार नव्हता, तरीही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारापेक्षा अधिक मतं मिळवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “राज्यसभा निवडणुकीत आम्ही १२३ मतं घेतली होती. आता आम्ही १३४ मते घेतली आहेत. मी पहिल्यापासून सांगत होतो की, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्यात समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. त्यामुळे आमदार आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरून आमच्या पाचव्या उमेदवाराला मतं देतील, असा विश्वास होता. तेच ह्या निवडणुकीच्या निकालातून पाहायला मिळालं.”
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की,”पाचव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमच्याकडे एकही मत नव्हतं, तरीही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारापेक्षा जास्त मतं मिळवली आहेत. एवढंच नाही, तर आमच्या इतरही ४ उमेदवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मतं मिळवली आहेत. त्यामुळे आमचा मोठा विजय झाला आहे.” यावेळी त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचं आभार मानलं आहे. दोन्ही आमदार आजारी असताना देखील त्यांनी मतदान करून भाजपाच्या विजयात हातभार लावला आहे.