“महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हेही वाचा >> Sharad Pawar : “मी घरी बसणार नाही”, विधानसभेच्या पराभवानंतर शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती!
“मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अशा सर्वांचा मी कायम ऋणी राहीन!”, असं फडणवीस म्हणाले.
“आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत मोदींच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील. पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार. आपला विश्वास आणि प्रेम सदैव राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, असं म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती…
लोकसभेनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका झाल्या असत्या तर त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता होती. त्यामुळे फडणवीस यांनी पराभवाच्या कारणांचा शोध घेत त्यावर उपाययोजना सुरू केल्या. शिवाय कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये म्हणून त्यांच्यात पुढची निवडणूक आपणच जिंकणार असा विश्वास निर्माण केला. प्रचारासाठी बुथनिहाय नियोजन करण्यात आले. उमेदवारी वाटप करताना सर्व समाजघटकांचा विचार करण्यात आला. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीचा लाभ निवडणुकीत व्हावा हे चाणाक्षपणे पाहण्यात आले. या सर्व प्रयत्नांचे फळ म्हणून भाजपसह महायुतीतील घटक पक्षांनाही मिळाले.