भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील टीकेला प्रत्युत्तर दिलंय. “आता तुम्ही शप्पथ घ्या किंवा देवावर हात ठेवा लोकांना हे पटणार नाही. कारण काही गोष्टींमध्ये मीही साक्षीदार आहे,” असं म्हणत गिरीश महाजन यांनी हिंदुत्व आणि मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली.

गिरीश महाजन म्हणाले, “ते म्हणतात भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं असं नाही. मात्र, ते दाऊदच्या अनुयायांसोबत जाऊन बसले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसला. किंबहुना त्यांच्या मांडीवर जाऊन बसलात. त्याचवेळी तुम्ही हिंदुत्व सोडलं होतं.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावले आणि मतं घेतली”

“तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर लढलात, आमच्यासोबत लढलात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावले आणि मतं घेतली. आता तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. लोकांना हे न पटण्यासारखं आहे,” असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.

“आता तुम्ही शप्पथ घ्या किंवा देवावर हात ठेवा लोकांना हे पटणार नाही”

गिरीश महाजन पुढे म्हणाले, “तुम्ही आता शपथ घेऊन सांगता. आधी प्रचाराच्यावेळी एखाद्या व्यासपीठावर भाषण सुरू असताना सांगितलं असतं तर लोकांना पटलं असतं. मात्र, आता तुम्ही शप्पथ घ्या किंवा देवावर हात ठेवा लोकांना हे पटणार नाही. कारण काही गोष्टींमध्ये मीही साक्षीदार आहे.”

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांच्या BKC मधल्या भाषणाची स्क्रीप्ट BJP, RSS ने लिहून दिली”; “भाजपाला मुंडे, शिंदे, ठाकरेंच्या मेळाव्यात स्थान नाही”

“तुम्ही शपथा खाऊन लोकांना भुलवू शकत नाही”

“तुमच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही. तुम्ही भावनिक होऊन, शपथा खाऊन लोकांना भुलवू शकत नाही. शिवसैनिक आणि लोक तुमच्या पाठिशी राहिलेले नाहीत,” असंही महाजन यांनी नमूद केलं.