लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून एकनाथ खडसे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनीही स्वत: माध्यमांशी बोलताना आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांचा भाजपात प्रवेश होईल, असं बोललं जात होतं. मात्र, अद्याप त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. यावरूनच भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. “उशीर कशाला करताय? आता काय मुहूर्त काढायचा का?, एकीकडे पक्ष प्रवेशाची घाई झाली म्हणायचं आणि दुसरीकडे पक्षावर टीका करायची. अशी दुटप्पी भूमिका त्यांनी घेऊ नये”, असा टोला गिरीश महाजनांनी खडसेंना लगावला. ते आज माध्यमांशी बोलत होते.
गिरीश महाजन काय म्हणाले?
एकनाथ खडसे यांच्या भाजपातील प्रवेशासंदर्भात गिरीश महाजन यांना विचारण्यात आले असता, ते म्हणाले, “एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. ते थेट दिल्लीत बोलतात. आम्ही कुठे म्हणालो की आम्ही कोण आहोत”, असा टोला महाजनांनी खडसेंना लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला संमती दिल्याचं बोललं जात आहे, असा प्रश्न महाजनांना माध्यामांच्या प्रतिनिधींनी विचारला असता त्यावर उत्तर देताना महाजन म्हणाले, “मग चांगलं आहे ना? उशीर कशाला करता? आता काय मुहूर्त काढायचा का? तुम्हीच तारखा देत आहात. आम्ही कुठं काय म्हणत आहोत. तुमचीच तारीख पे तारीख चालली. निवडणुकीच्या आधी येतो, नंतर येतो. आता या लवकर”, असा टोला गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर बोलताना लगावला.
हेही वाचा : “फोटोग्राफीची आवड असलेला मुख्यमंत्री बनला तर…”, पॅशन आणि करिअरवरून फडणवीसांची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पावर बोलताना महायुती सरकारवर टीका केली होती. खडसे म्हणाले की, ‘कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही. मग नवीन योजनांसाठी सरकार पैसा कुठून आणणार? याचं उत्तर देण्यात आलेलं नाही. अर्थसंकल्प चांगला होता. मात्र, प्रत्येक्षात या घोषणांची अंमलबजावणी होईल की नाही? याबाबत शंका आहे’, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती.
या टीकेवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे यांनी अधिवेशनात बोलावं. बाहेर अशा पद्धतीने बोलू नये. पक्षात यायची घाई झालेली आहे. मला संमती दिलेली आहे, असं म्हणायचं. मात्र, दुसरीकडे पक्षावर टीका करायची. असी दुटप्पी भूमिका त्यांनी घेऊ नये, काय असेल ती एक भूमिका घ्यावी”, असंही गिरीश महाजन म्हणाले.