राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे काही दिवसांपू्र्वी आपली सूनबाई आणि भाजपा खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी गेले होते. पण अमित शाहांनी त्यांची भेट नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रकारानंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. अमित शाहांशी माझी फोनवरून चर्चा झाल्याचं खडसेंनी सांगितलं.
या घटनाक्रमानंतर एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्या भेटीसंदर्भात भाजपा नेते गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ खडसे आणि रक्षाताई खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. मात्र, त्यांची भेट झाली नाही. मी रक्षाताईंना फोन केल्यानंतर त्यांनीच मला ही माहिती दिली, असा दावा गिरीश महाजनांनी केला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “सीएम शिंदेंना धमकी देणारे कोण आहेत? हे…” विनायक राऊतांची अमित शाहांकडे चौकशीची मागणी
संबंधित प्रकरणाबाबत प्रतिक्रिया विचारली असता गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे आणि अमित शाहांच्या भेटीबाबत मी प्रसारमाध्यमांतूनच ऐकलं. यानंतर मी थोडीशी अधिक माहिती घेतली. अमित शाहांच्या कार्यालयाबाहेर एकनाथ खडसे आणि रक्षाताई खडसे बसल्याची माहिती मला मिळाली. मला अमित शाहांच्या कार्याबाहेरून एक फोन आला होता. यानंतर मी रक्षाताईंना फोन करून याबाबत विचारलं. तेव्हा रक्षाताईंनीच मला सांगितलं की, आम्ही येथे जवळपास तीन तास बसलो. पण आम्हाला वेळ दिला नाही किंवा अमित शाहांनी भेटायला नकार दिला, असं मला कळालं. ते अमित शाहांना भेटायला गेले होते. मात्र, त्यांच्यात भेट झाली नाही, एवढं मला निश्चित कळालं आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे.
हेही वाचा- “…तर उद्याच सरकार कोसळेल” एकनाथ खडसेंच्या विधानावर गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रकरणावरही महाजनांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमात वावरत आहेत, त्यामुळे त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असंही महाजन म्हणाले.