Girish Mahajan : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. एकीकडे महायुतीच्या नेत्यांचे दौरे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. या दौऱ्यांच्या माध्यमातून नेते मंडळी मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीही करत आहेत. तसेच निवडणुकीच्या आधी सभा आणि मेळाव्यांचाही धडाका सुरु आहे. या सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे असतानाच भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. “एकनाथ खडसेंचा खूप मोठा राजकीय प्रवास होता. आता ते दुसऱ्या पक्षात गेले आहेत. मात्र, त्यांचं काय राहीलं? काहीच राहिलं नाही. ते पक्ष सोडून गेले, त्यांच्या पत्नीसुद्धा निवडून आल्या नाहीत”, अशा खोचक शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन आज नांदेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली.

हेही वाचा : कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा, बाळ मानेंची मागणी; उदय सामंत यांच्या खात्यावर आरोप

गिरीश महाजन काय म्हणाले?

“एकनाथ खडसे आता दुसऱ्या पक्षात गेले आहेत. त्यांचं काय झालं? त्यांचं काहीच राहिलं नाही. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे घोडा मैदान जवळ आहे. एकनाथ खडसे हे देखील जळगावमध्ये खूप मोठे नेते होते. त्यांचा मोठा प्रभाव होता. मात्र, ते दुसऱ्या पक्षात गेले मग त्यांचं काय झालं? एकनाथ खडसे हे आता सांगत असतील की माझं असं होतं, माझी दूध डेअरी होती. मात्र, ते भारतीय जनता पक्ष सोडून गेले आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी देखील निवडून आल्या नाहीत. दूध डेअरीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीचाही पराभव झाला”, असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी केला.

“आमचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे त्या ठिकाणी जामनेरमध्ये १५० किलोमीटर जाऊन त्यांच्या मतदारसंघात उभे राहिले होते. मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नीचा पराभव केला. त्या दूध डेअरीच्या संचालक होत्या. मात्र, त्यांच्या संचालकांपैकी कोणीही निवडून आलं नाही. एवढंच नाही तर जिल्हा बँकेमध्येही त्यांचं काही राहिलं नाही. विधानसभेला त्यांच्या कन्येचा देखील पराभव झाला. त्यामुळे कोणी पक्षात आले आणि गेले हे सुरुच राहणार, आमच्याकडे पक्ष संघटनेचं काम जोरात सुरु आहे”, अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader girish mahajan on eknath khadse in jalgaon politics assembly elections 2024 gkt