उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने कारवाई केल्यानंतर त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. १३ महिन्याच्या तुरुंगावासानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती. मात्र, या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र होतं, असा गंभीर आरोप देशमुखांनी केला होता. यातच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा.श्याम मानव यांनी यावर भाष्य केलं आणि हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं.
प्रा.श्याम मानव यांनी केलेल्या विधानाला अनिल देशमुखांनी दुजोरा दिला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही इशारा देत अनिल देशमुखांचं रेकॉर्डिंग माझ्या हाती आहे, असं विधान केलं. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता भाजपाचे नेते, गिरीश महाजन यांनीही या प्रकरणावरून अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. ‘अनिल देशमुख हे आता बोलत आहेत, आरोप करत आहेत. मात्र, ते तेव्हा काय झोपले होते का?’, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी देशमुखांवर टीका केली.
हेही वाचा : मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा; म्हणाले, “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी…”
गिरीश महाजन काय म्हणाले?
अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “अनिल देशमुख तेव्हा काय झोपले होते का? त्यांना आज का जाग आली? पण त्यांना आता जाग का आली? याची कल्पना आम्हाला आहे. कारण जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सांगितलं की, अनिल देशमुखांनी त्यांच्यावर किती दबाव टाकला होता. गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करा. आता पुण्याला घडलेला गुन्हा तीन वर्षांनी मुक्ताईनगर येथे दाखल करा. यासाठी देशमुखांनी किती दबाव पोलीस अधीक्षक मुंडेंवर टाकला होता. हे वेळोवेळी आम्हालाही समजलं आहे. एवढंच नाही तर तुला सस्पेंड करेल अशा धमक्याही त्यांना अनिल देशमुखांनी दिल्या होत्या. शेवटी तो गुन्हा माझ्यावर त्यांनी नाईलाजाने दाखल केला. पण आता सर्व सत्य सीबीआयच्या चौकशीत समोर आलं आहे. हा विषय आता भरकटला जावा म्हणून अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत”, असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी केला.
गिरीश महाजनांची विरोधकांवर टीका
“केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती मदत केली हे पाहण्यासाठी विरोधकांनी डोळे बंद केलेत का? की त्यांचे कान बहिरे झाले आहेत. केंद्राने किती मोठी मदत केली हे आपण पाहिलं. देवेंद्र फडणवीस यांनीही ते स्पष्ट केलं आहे. रेल्वे विभागासाठी किती पैसे मिळाले? विकासाच्या कामासाठी किती पैसे मिळाले? मला वाटतं की विरोधक कोणतं तरी एक कारण काढतात आणि त्यामध्ये कमी जास्त करत बसतात. पण हे विरोधकांचं कामच असतं आणि ते त्यांचं काम करत आहेत. पण महाराष्ट्राला काय मिळालं? हे जरा विरोधकांनी डोळे उघडे ठेऊन पाहिलं पाहिजे. त्यासाठी बजेट वाचा मग तुम्हाला कळेल. पण त्यांनी तसंही झोपलेल्याचं सोंग घेतलेलं आहे”, अशी टीका गिरीश महाजनांची महाविकास आघाडीवर केली.