भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर युरोप आणि इंग्रजांचा प्रभाव होता, असे विधान केले आहे. ते आज (२८ जानेवारी) पुण्यात जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या युवा संसद सोहळ्यात बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची संस्कृती, परंपरा जपण्याचे काम ताकदीने करत आहेत, असेही पडळकर म्हणाले. विशेष म्हणजे नेहरूंनी स्वत:ला पंतप्रधान असताना भारतरत्न पुरस्कार दिला. मात्र देशाला सामाजिक न्याय देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी व्ही. पी सिंह यांचे सरकार येईपर्यंत वाट पाहावी लागली, असेही पडळकर म्हणाले.
जवाहरलाल नेहरू यांच्यावर इंग्रज आणि युरोपचा प्रभाव होता
“आयडिया ऑफ इंडियाचे वर्गीकरण दोन टप्प्यांत करता येईल. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरी यांचे पर्व तसेच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ अशा दोन विभागात हे वर्गीकरण करता येईल. जवाहरलाल नेहरू तसेच नरेंद्र मोदी यांच्या काळातील बदलत्या परस्थितीचा व्यवस्थित विचार केला पाहिजे. जवाहरलाल नेहरू यांच्यावर इंग्रज आणि युरोपचा प्रभाव होता. तेव्हा नेहरुंना सध्याची नवी दिल्ली तसेच नवी दिल्लीतील परिसर, संसद, राष्ट्रपती भवन, मंत्र्यांची बंगले, मंत्रालयांची कार्यालये या ठिकाणांनाच भारत असल्यासारखे वाटायचे,” असे मत पडळकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >> MIMची महाविकास आघाडीला युतीसाठी खुली ऑफर; इम्तियाज जलील म्हणाले, “ओवैसी साहेबांसोबत…”
पायाभूत सुविधा पुरवण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या काळात झाले
“इशान्य भारतात तरुणांनी शस्त्रे हातात घेतली. त्यांनी नक्षलवादाला जवळ केलं. तेथे अनेक हत्याकांड झाले. अनेकवेळा लोकांना वेठीस धरले गेले. त्या भागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणणं गरजेचे असतानाही त्या काळात दुर्लक्ष केले गेले. मात्र आज ईशान्य भारतात युवकांच्या हातात काम देण्याचे तसेच पायाभूत सुविधा पुरवण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या काळात झाले आहे. त्यामुळे तेथील तरुणांनी शस्त्र बाजूला ठेवली आहेत. ते तरूण आता देशाला पुढे नेण्याचे काम करत आहेत,” असेही पडळकर म्हणाले.
व्हीपी सिंह यांचे सरकार येईपर्यंत भारतरत्न पुरस्काराची वाट पाहावी लागली
“नेहरू स्वत: पंतप्रधान असताना भारतरत्न झाले. मात्र ज्यांनी या देशाला सामाजिक न्यायाची भूमिका समजावून सांगितली त्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना व्ही. पी सिंह यांचे सरकार येईपर्यंत भारतरत्न पुरस्काराची वाट पाहावी लागली. तेव्हा अशी परिस्थिती होती. अखंड जगात भारताचे, आपल्या संस्कृतीचे एक वेगळे महत्त्व आहे. आपली कला, संस्कृती, परंपरा जपण्याचे काम पंतप्रधान मोदी ताकदीने करत आहेत,” असे वक्तव्य पडळकर यांनी केले.