राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण झालाय. आव्हाड यांनी या कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपानं केलं आहे. असं असतानाच आता भाजपाचे आमदार आणि नेते गोपीचंद पडळकर यांनीही आव्हाडांना टोला लगावला आहे. आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करण्यासाठीचे कंत्राटी कामगार असल्याचं पडळकर म्हणाले आहेत.
आव्हाड काय म्हणाले?
महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आव्हाड यांच्या भाषणाचा ५१ सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. “ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,” असं आव्हाड या व्हिडीओत म्हणता दिसत आहेत.
नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन…
“ओबीसींवरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल,” असं आव्हाड म्हणाले आहेत.
पडळकरांनी साधला निशाणा…
“जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वतःला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला?,” असा प्रश्न पडळकर यांनी आव्हाड यांना विचारलाय. “वेळ पडली तर प्रशासक नेमू, म्हणजे आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच त्यांचा हेतू आहे,” असंही पडळकर म्हणालेत.
पडळकरांचा अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल
पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधलाय. “मागचं दिड वर्ष फक्त केंद्राच्या नावाने ओरड केली पण आता यांच्या पायाखालची जमीन सरकलीय,” असं पडळकर अजित पवारांवर टीका करताना म्हणालेत.
“आत्ताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहीती नाही. राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत,” अशा शब्दांमध्ये पडळकरांनी अजित पवार आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.