आज विधानसभेत अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले. यानंतर उपाध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी “आदिवासी असून देखील नरहरी झिरवळ यांनी चांगलं काम केलं” असं विधान केलं. जातीचा उल्लेख केल्यानं जयंत पाटलांनी माफी मागितली.
या मुद्द्यावरून आता भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पडळकर म्हणाले की, “जयंत पाटलांची सत्ता गेली आहे, पण माज अजून गेला नाही, हा माजोरडापणा त्यांचा अनेक वर्षांपासून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील बोलायला आले, तेव्हा त्यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याबाबत बोलताना, आदिवासी समाजातून येऊन सुद्धा चांगलं काम केलं, असा उल्लेख केला. आदिवासी समाजातून येऊन सुद्धा म्हणजे काय?” असा सवाल देखील पडळकरांनी यावेळी विचारला.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, “तुमच्या डोक्यातील जातीयवाद अजून जायला तयार नाही. तुमच्या जे पोटात आहे ते ओठामध्ये येतंय. इथला आदिवासी, इथला मागासवर्गीय, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जातीतील एखादा माणूस काही करू शकत नाही का? त्यांना वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने जातीवादामध्ये कसं अडकवता येईल, अशा पद्धतीचा प्रयत्न राज्यातील प्रस्थापितांनी नेहमीच केला आहे. त्याचाच एक भाग जयंत पाटलांनी आज सभागृहात बोलून दाखवला,” असंही पडळकर म्हणाले.
हेही वाचा- “मोदी सरकारला फक्त काँग्रेसमुक्त भारत नकोय, तर विरोधी पक्षमुक्त भारत हवाय”, कपिल सिब्बल यांची टीका
“देवेंद्र फडणवीसांनी ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर जयंत पाटलांना सारवासारव करावी लागली. पण त्यांना मला हेच सांगायचं आहे की, गेल्या २०-३० वर्षांच काही मोजक्या लोकांनी ‘आम्हीकिती बुद्धीमान आहोत’ असं वातावरण तयार केलं आहे. असं वातावरण तयार करण्यात ते यशस्वी झाले. राज्यात आम्हीच काहीतरी करू शकतो, असा गोड गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण आता लोक हूशार झाले आहेत. ते तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाहीत, मी जयंत पाटलांचा निषेध करतो,” अशा शब्दांत पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.