Harshvardhan Patil : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अनेक नेत्यांचे विविध मतदारसंघात दौरे सुरु आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीसह आदी पक्षांच्या ठिकठिकाणी सभा सुरु आहेत. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भारतीय जनता पार्टीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे.

यासंदर्भात आज (२८ सप्टेंबर) हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलं आहे. विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे, असा जनतेचा तीव्र आग्रह आहे. त्यामुळे पितृ पंधरवडा झाल्यानंतर योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्ही भाजपा सोडणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “लोकांचा आग्रह तुम्ही निवडणूक लढवा असा आहे”, असं भाष्य हर्षवर्धन पाटील यांनी केलं.

हेही वाचा : Prakash Ambedkar : ठाकरे गटाला महाविकास आघाडीत किती जागा मिळतील? प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, “फक्त…”

हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?

“गेल्या महिन्याभरापासून आमचा जनता दरबार आणि नागरिकांशी जनसंवाद सुरु आहे. या जनसंवादामधील शेवटचा एक गट बाकी होता. आज तोही पार पडला. या ठिकाणी आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या अडचणी गावातील स्थानिक प्रश्न आणि शेतकऱ्यांचे व्यक्तिगत प्रश्न अशा स्वरुपाची ही बैठक होती. आता आगामी विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवली पाहिजे, असा आग्रह जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. जनतेच्या आग्रहामुळे कोणतं चिन्ह हाती घ्यायचं? काय निर्णय घ्यायचा? याबाबत जनतेचा तीव्र आग्रह आहे. त्यामुळे मी भूमिका मांडली की लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे, म्हणून जनतेच्या मनामध्ये जे आहे. त्याचा मला गांभीर्याने विचार करावा लागेल”, असं सूचक भाष्य हर्षवर्धन पाटील यांनी केलं.

“कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. जनतेच्या या आग्रहाचा मी विचार केला पाहिजे, असा दबाव इंदापूर तालुक्यातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचाही आहे. आता पितृ पंधरवडा सुरू होत आहे. पितृ पंधरवडा झाल्यानंतर मला योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल. तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये जे आहे, त्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. पितृ पंधरवडा झाल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकदा एकत्र बसून चर्चा करू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू”, असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तुम्ही भाजपा सोडणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता हर्षवर्धन पाटील म्हणाले, “लोकांचा आग्रह असा आहे की, तुम्ही निवडणूक लढवा. आता काही लोकांचं म्हणणं आहे की, तुम्ही तुतारी हातात घ्या. काही लोकांचं म्हणणं आहे तुम्ही अपक्ष निवडणूक लढवा. काही लोक असंही म्हणत आहेत की, ही जागा महायुतीत आपल्याला सुटली पाहिजे. त्यामुळे लोकांच्या आग्रहाचा विचार करून मी पुढे योग्य तो निर्णय घेईन”, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.