शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा तसेच शिंदे गटावर खरपूस टीका केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व तसेच शिवसेनेतील बंडखोरीवरही भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत भाजपा आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे सत्तावाटपाचे सूत्र ठरले होते, असे सांगितले. उद्धव ठाकरेंच्या याच दाव्यावर आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंची सर्व भाषणं एकसुरी असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घ्यायला नको होती, अशी प्रतिक्रिया उपाध्ये यांनी दिली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
हेही वाचा >>> धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास उद्धव ठाकरेंकडे पर्याय काय? शिवसेनेतील महिला नेत्याने पहिल्यांदाच दिलं थेट उत्तर, म्हणाल्या…
उद्धव ठाकरे यांची सर्व भाषणं एकसुरी आहेत. त्यांच्या भाषणात हताश आणि निराश मानसिकता होती. बाळासाहेब ठाकरे हे अत्यंत पवित्र नाव आहे. खोट्या शपथा घेऊन त्या नावाचे पावित्र्य कमी करू नये. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना मी आमदारकीचाही राजीनामा देणार आहे, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र त्यांनी अद्याप आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. ते जाहीरपणे माध्यमांवर दिलेले शब्द पाळत नाहीत. त्यांनी शपथेखाली दावे करणे तसेच गप्पा करणे सोडावे. बाळासाहेब ठाकरेंसारख्या पवित्र नावाची शपथ त्यांनी घ्यायला नको होती, असे केशव उपाध्ये म्हणाले.
हेही वाचा >>> जयदेव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया, रामदास कदमांचं नाव घेत मनिषा कायंदे म्हणाल्या…
भाजपाने आमच्याशी गद्दारी केली असा दावा उद्धव ठाकरेंकडून केला जातो. यावरही केशव उपाध्ये यांनी भाष्य केले. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून आले. निवडणूक झाल्यानंतर ते वेगळे झाले. येथेच खरी गद्दारी झाली. ही गद्दारी भाजपाशी नव्हे तर जनतेशी होती. उद्धव ठाकरे यांनी काल हताश आणि निराश मानसिकतेतून भाषण केले. त्यांची भाषणं ही एकसुरी आहेत, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.