शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाडमध्ये झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान मतदारांना ‘बजरंग बली की जय’ म्हणा सांगतात. मग तुमचे बळ आणि ५६ इंचाची छाती कुठे आहे? असा सवाल त्यांनी मोदींना विचारला होता. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे वैरी, आज बाळासाहेब असते तर…”; कर्नाटक दौऱ्यावरून संजय राऊतांचं टीकास्र!

भाजपाचे नेते तथा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. “राज्याचे स्वघोषित कुटुंबप्रमुख असलेले उद्धव ठाकरे वेळ आली की मैदान सोडून घरात बसतात. मात्र, आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘जय बजरंगबली’ विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्त्व गुंडाळणारे आज ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणा असं सांगतात. मात्र, ते स्वत:च्या हिंदुत्त्वाबाबत कधीही बोलत नाहीत”, असे ते म्हणाले.

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी महाडमधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली होती. “आज पंतप्रधान मतदारांना ‘बजरंग बली की जय’ म्हणा सांगतात. मग तुमचे बळ आणि ५६ इंचाची छाती कुठे आहे? त्यामुळे यापुढील प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत भाजपाला तडीपार करा,” असे ते म्हणाले होते. तसेच उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्व सोडलं या शिंदे गटाच्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. “उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, अशी बोंब ठोकली जाते. मात्र, आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलंय, ‘मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेकी आणि देशद्रोह्यांना बडवणारा हिंदू पाहिजे,’” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader keshav upadhye replied uddhav thackeray after criticism on pm modi jay bajrangbali statement spb