राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापेमारी केली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर ही धाड टाकण्यात आली आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचं समोर येत आहे. यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘एबीपी माझा’शी बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, “शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे लाडके हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावायला १५०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं. उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण दाबलं होतं. पण, मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन दिलं आहे, की सर्व घोटाळेबाजांचा हिशोब घेऊनच राहणार आहे.”
हेही वाचा : सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”
“ग्रामविकास मंत्री असताना हसन मुश्रीफ यांनी १५०० कोटी रुपयांचं कंत्राट जावयाच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला दिलं. सरसेनापती कारखानाच्या माध्यमातून १५८ कोटी रुपयांचं मनी लाँड्रींग करण्यात आलं. या सर्वांचा आता हिशोब होत आहे,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विशिष्ट जातीच्या…”
काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होतं. २०२० साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, तरी सुद्धा या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.