Baba Siddique Firing : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील निर्मल नगर परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर केले. हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांच्या छातीला गोळी लागली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपाचारादरम्यान बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणावर आता भारतीय जनता पक्षाचे नेते, किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत बाबा सिद्दीकी यांची हत्या ही चिंतेची बाब असून राज्य सरकारने एक विशेष टीम बनवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

किरीट सोमय्या काय म्हणाले?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, “बाबा सिद्दीकी यांची हत्या ही चिंतेची बाब आहे. राज्य सरकारने एक विशेष टीम बनवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. हे एक मोठे षडयंत्र असल्याचे दिसते. यामध्ये जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे”, असं भाजपा नेते किरीट सोमय्या म्हटलं आहे.

बाबा सिद्दीकींवर तिघांकडून गोळीबार

बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांच्यांवर तीन जणांनी गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर विरोधी पक्षाकडून गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान, या हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहितीही सांगण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी काय म्हटलं?

“बाबा सिद्दीकींवर प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यातला एक आरोपी हरियाणाचा आहे. तर दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. मुंबई पोलीस सक्षमपणे काम करत आहेत. कुणीही आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे.

Story img Loader