मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुजित पाटकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. करोना केंद्राच्या कंत्राटात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचाआरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत या गैरव्यवहारप्रकरणी चौकशीला गती मिळेल, असा दावाही सोमय्या यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोविड केंद्राच्या कंत्राटात आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार होती. पण न्यायालयाने सुनावणीची तारीख पुढे ढकलली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, आज न्यायालयाने पुन्हा एकदा सुनावणीची तारीख पुढे ढकलली आहे. आझाद मैदान पोलिसांनी चौकशी सुरू केली असून पोलिसांशी माझी विस्तृत चर्चा झाली आहे. त्यांना आणखी आमच्याकडून काही माहिती हवी असल्यास ती द्यायचं आम्ही मान्य केलं आहे.

संबंधित गैरव्यवहाराप्रकरणी पार्टनरशीप करार, कंपनीची रचना, कंपनीचा अनुभव, कंपनीला किती पैसे मिळाले? याची सर्व माहिती गोळा करण्याचं काम पोलीस करत आहेत. तसेच कंत्राट मिळवण्यासाठी महापालिकेत बनावट कागदपत्रे जमा केल्यामुळे अधिकची कागदपत्रे पोलिसांनी मागवली आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की, येत्या पाच ते सहा दिवसात या चौकशीला गती मिळेल. पोलिसांकडे आम्ही एक चिंता व्यक्त केली आहे की, आरोपी सुजित पाटकर हा पळून जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांनी योग्य ती काळजी घ्यावी, असा आग्रह आम्ही पोलिसांकडे केला आहे, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

हेही वाचा- करोना केंद्राच्या कंत्राटातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी सुजित पाटकर आणि अन्य तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

नेमकं प्रकरण काय आहे?
करोना केंद्राच्या कंत्राटातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकरसह आणखी तिघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर त्यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर रडारवर आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader kirit somaiya on sujit patkar covid centre scam sanjay raut rmm