अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. वर्तनगर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. दंडाधिकाऱ्यांनी १० हजार रोख आणि एका जामीनाच्या आधारावर जामीन मंजूर केला आहे.
“सव्वा वर्षानंतर शेवटी कोर्टाने न्याय दिला. जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याचे आदेश दिले. ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली. अनंत करमुसेला न्याय मिळाला. आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये. आम्ही राज्यपालांकडे जितेंद्र आव्हाड यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहोत. “, असं किरीट सोमय्या त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
“अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली.”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्या वेळी निवासस्थानी आव्हाड उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करसुमे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटकही केली आहे. तर, अनंत करमुसेंविरोधातही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनंत यांच्या पत्नीला पोलिसांनी चौकशीसाठी समजपत्र पाठविले होते.