शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये राज्यात युती तुटल्यापासून विस्तव देखील जात नाही. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर नेहमीच कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात दिसतात. शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे नेहमीच भाजपावर सातत्याने टीका करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. होळीच्या निमित्ताने एकीकडे रंगांची धुळवड सुरू असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात मात्र राजकीय धुळवड दिवसभर सुरू होती. त्यातच कृपाशंकर सिंह यांनी रंगांच्या धुळवडीनंतर संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील घरी आज होळीचा उत्साह पाहायला मिळाला. आपल्या कार्यकर्त्यांसोबत, तसेच आप्तस्वकीयांसोबत होळी खेळल्यानंतर माध्यमांशी बोलकाना कृपाशंकर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी संजय राऊतांकडून भाजपावर सातत्याने टीका केली जात असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी राऊतांवर खोचक शब्दांत टोला लगावला.
“संजय राऊत माझे चांगले मित्र”
संजय राऊतांशी आपली चांगली मैत्री असल्याचं कृपाशंकर सिंह यावेळी म्हणाले. “संजय राऊत माझे चांगले मित्र आहेत. आमची मैत्री आहे. पण आज होळीच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की ते वारंवार म्हणत असतात शिवसेनेचे लोक अयोध्येला कारसेवेसाठी गेले, मंदिर बनवण्यासाठी गेले, आम्ही हिंदुत्वाचं पालन करू, आम्ही हिंदू आहोत वगैरे. ते वारंवार हे बोलत आहेत. पण त्यांना दोन पक्षांच्या सरकारसोबत वाटचाल करायीच आहे”, असं कृपाशंकर सिंह म्हणाले.
संजय राऊतांचा भाजपाला इशारा; म्हणाले “महाराष्ट्रातही खूप खड्डे खणलेत; आम्ही जर शिमगा केला…”
“जोगिरा सारारारा…”
यावेळी बोलताना कृपाशंकर सिंह यांनी राऊतांना खोचक टोला लगावला. “असं म्हणतात वृंदावन मे आना है, तौ राधे राधे कहना है… पण संजय राऊतांचं असं आहे की ‘दिन में बोले जय श्री राम, और रात को लेते सौ सौ ग्राम.. जोगिरा सारारारा!”, असं सिंह म्हणाले.
यानंतर सारवासारव करताना “राऊत आमचे चांगले मित्र असून त्यांची भेट घेऊन काही विषयांवर चर्चा करायची आहे”, असं कृपाशंकर सिंह म्हणाले.