ब्रिटनस्थित व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची होती, असं मानलं जात आहे. या वाघनखांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी वाघनखांबाबत काही सवाल उपस्थित केले होते. यावरून माजी मंत्री, भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील सदर वाघनखे तीन वर्षांसाठी उसनावारी देण्याचं मान्य केलं आहे. मग, हे कर्जावर आहे की परतावा आहे? परतावा असेल, शिवाजी महाराज यांचं मंदिर व्हावं आणि त्यात वाघनखे ठेवण्यात यावी. पण, ही वाघनखे शिवकालीन की शिवाजी महाराज यांनी वापरलेली आहेत?” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले होते.

यावर लक्ष्मण ढोबळे म्हणाले, “जगातील लोकांनी मान्यता दिलेल्या वाघनखांबद्दल पिता-पुत्र चुकीचं बोलत आहेत. पिता-पुत्र झोपेत बरळतात. ही वाघनखे इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी आणली जात आहेत. पहिली आणि दुसरी मातोश्री बांधली तरी समाधान मिळत नाही.”

“माझा बाप चोरीला गेला म्हणत आहेत. चिन्ह गेलं, आमदार सोडून गेले, पक्ष गेला, तरी देखील ओरडत फिरत आहेत,” अशी टीका लक्ष्मण ढोबळे यांनी ठाकरेंवर केली आहे.

लक्ष्मण ढोबळे यांना ठाकरे गटातील नेते, शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “लक्ष्मण ढोबळे वडिलांसारखे आहेत. पण, यापुढे त्यांनी शिवसेना आणि मातोश्रीवर बोलू नये. अन्यथा आम्हालाही मर्यादा सोडता येते,” असा इशारा शरद कोळी यांनी लक्ष्मण ढोबळे यांना दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader laxman dhobale attacks uddhav thackeray and aaditya thackeray over waghnakhe ssa
Show comments