Madhukar Pichad : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मधुकर पिचड यांना ऑक्टोबरमध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकमधील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून मधुकर पिचड यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज (६ डिसेंबर) वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधुकर पिचड यांच्या निधनामुळे अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मधुकर पिचड हे राज्याचे माजी मंत्री होते. अहिल्यानगर (अहमदनगर) अकोले विधानसभा मतदारसंघातून मधुकर पिचड हे तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच मधुकर पिचड यांनी अनेक महत्वाची पदे भुषवली आहेत. तसेच आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून देखील कार्यभार त्यांनी पाहिला होता. अकोले तालुक्यामधील विकासात मधुकर पिचड यांचं महत्वाचं योगदान मानलं जातं. दरम्यान, २०१९ मध्ये मधुकर पिचड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

हेही वाचा : Devendra Fadnavis On Trolling : मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ट्रोलर्सचे मानले आभार; म्हणाले, “माशी जरी शिंकली…”

मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कसा होता?

  • अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून १९७२ ला निवड.
  • १९७२ ते १९८० पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड.
  • १९८० पासून २००९ पर्यंत सलग ७ वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले.
  • १९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.
  • राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही मधुकर पिचड यांनी धुरा सांभाळली होती.
  • मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजपा.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते.
  • २०१४ मध्ये अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले.
  • २०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपाच्या तिकीटावर पराभव झाला.
  • मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली.
  • मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला.
  • आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती.

शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

“मधुकर पिचड हे महाराष्ट्रातील अदिवासी समाजाचे जेष्ठ नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी अतिशय चांगली सांभाळली होती. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली होती. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं. ते आम्हा सर्वांचे जीवाभावाचे सहकारी ते होते. मधुकर पिचड यांचं जाणं हे शेतकऱ्यांना आणि अदिवासी समाजाला धक्का बसणारं आहे. त्यांच्या पिचड कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना करतो.”, असं शरद पवारांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं.

दिलीप वळसे पाटलांनी वाहिली श्रद्धांजली

“विधिमंडळातील आमचे जुने सहकारी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. या कठीणप्रसंगी मी त्यांच्या परिवाराप्रती सहवेदना व्यक्त करतो व पिचड कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader madhukar pichad passed away he took his last breath at the age of 84 gkt