सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या कार्यक्रमात भाषण करताना लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडाची थेट तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. “शिवाजीमहाराजांना आग्र्याच्या किल्ल्यात औरंगजेबाने बंद केले होते. पण हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी शिवाजीमहाराज त्या किल्ल्यातून बाहेर पडले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंना थांबवण्याचेही खूप प्रयत्न झालेत. पण शिंदेंही बाहेर पडले. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी”, असं विधान लोढा यांनी केलं आहे.
लोढांच्या या विधानावर आदित्य ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. “ज्यांना महाराष्ट्र खोके सरकार, गद्दार म्हणून ओळखतं, त्यांच्यासोबत महाराजांची तुलना हे महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यासारखं आहे. राज्यपाल जे बोलतात तेच मंत्री महोदय आज बोललेले आहेत. हा महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. हा आवाज नक्की कोणाचा?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
दरम्यान, प्रतापगडावरील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. “गड-किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणं आगामी काळात काढण्यात येतील. निधीची कोठेही कमतरता भासणार नाही. गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येईल. शिवरायांचा इतिहास आपल्याला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल. या प्राधिकरणांतर्गत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम केले जाईल”, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती.