लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे हे निवडून आले. संदिपान भुमरे खासदार झाल्यामुळे त्यांच्याकडे असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे रिक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात आता भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल सावे यांनी सूचक विधान केलं आहे. “आम्हाला पालकमंत्री पद दिलं तर शंभर टक्के ते भूषवायला आवडेल. जबाबदारी दिली तर कोणाला आवडणार नाही”, असं सूचक भाष्य अतुल सावे यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं.
अतुल सावे काय म्हणाले?
महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणासंदर्भात बोलताना अतुल सावे यांनी सांगितलं की, “सध्या पंढरपूरच्या वारीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अर्थसंकल्पामध्ये पालखी सोहळ्यातील प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिंडी याप्रमाणे घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये ‘माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत. तसेच मुलींना मोफत शिक्षण आणि शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे”, असं अतुल सावे यांनी सांगितलं.
हेही वाचा : “विधानसभेला मी त्या उमेदवारांची नावं घेऊन पाडायला सांगणार”, मनोज जरांगेंचा रोख कोणाकडे?
ठाकरे गटावर टीका
ठाकरे गटाबाबत बोलताना अतुल सावे म्हणाले, “खासदार संजय राऊत आतापर्यंत जेवढं बोलले त्यापैकी ९९ टक्के त्यांची विधानं खोटे ठरलेले आहेत. रोज सकाळी उठायचं आणि नऊ वाजता टीव्हीवर बोलायचं. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर जास्त बोलणार नाही. संजय राऊत यांच्या बोलण्याला आता कोणीही गांभीर्याने घेत नाही”, असा टोला अतुल सावे यांनी लगावला.
पालकमंत्री पदाबाबत सूचक भाष्य
छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत अतुल सावे यांनी सूचक भाष्य केलं. अतुल सावे म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा खासदार निवडून आलेला आहे. त्यांचे येथे पालकमंत्री आहेत. जर आम्हाला पालकमंत्री पद दिलं तर शंभर टक्के ते भूषवायला आवडेल. पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली तर काम करायला कोणाला आवडणार नाही. आमचं काम असंही चालूच आहे”, असं अतुल सावे यांनी म्हटलं.