भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी मंगळवारी केलेल्या तीन ट्वीटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं होतं. अन्य एक ट्वीट करत त्यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणीही केली होती. त्यांनी कुणाचही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता.
कालपासून घडलेल्या या घडामोडीनंतर आज भाजपा नेते मोहीत कंबोज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. एवढंच नव्हे तर फोन टॅपिंग प्रकरणातील आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्लादेखील फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. शुक्ला ह्या सध्या हैदराबाद याठिकाणी कार्यरत आहेत, असं असूनही त्या फडणवीसांची भेट घेण्यासाठी ‘सागर’ बंगल्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मोहीत कंबोज आणि रश्मी शुक्ला यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी फडणवीसांची भेट घेतली? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता तुरुंगात जाणार…
मोहीत कंबोज यांनी मंगळवारी एका ट्वीटमध्ये म्हटलं की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे.” दुसऱ्या एका ट्वीटमध्ये कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली होती. संबंधित ट्वीटनंतर मोहीत कंबोज यांच्यावर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी टीकाही केली आहे.