मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक वाद रंगतोय. मी संजय राऊत यांना तुरुंगात टाकणार, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. तर हिंमत असेल तर मला तुरुंगात टाकून दाखवा. मला नारायण राणे यांनी बोलायला लावू नये. मी त्यांची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली, तर ते ५० वर्षे तुरुंगात जातील, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. असे असतानाच आता नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. संजय राऊत खासदार झाले, हे माझंच पाप आहे, असे नारायण राणे म्हणाले आहेत. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
“संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी चांगले लिहावे. संजय राऊत हा खासदार आहे. ते माझंच पाप आहे. एकदा मला बाळासाहेब ठाकरे यांनी बोलावले होते. मी वरती गेलो. तेव्हा संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ बसलेले होते. मी बाळासाहेबांना नमस्कार केला. तेव्हा मी विधीमंडळात विरोधी पक्षनेता होतो. मी त्यांना कशाला बोलावले असे विचारले. त्यांनी मला सांगितले की, आपल्याला संजय राऊतला खासदार बनवायचे आहे. उद्या त्याचा फॉर्म भरायचा आहे. त्याला घेऊन जा. खासदार कर. मी बाळासाहेब ठाकरे यांना आयुष्यात कधीही नाही म्हणालो नाही. मी सांगितलं हो करतो. मी दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांना माझ्या दालनात कागदपत्रे घेऊन बोलावले होते,” असा दावा नारायण राणे यांनी केला.
हेही वाचा >>> “लक्ष्मणभाऊ जमिनीशी जुळलेले नेते..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबियांना सांत्वनपर पत्र
…तर नारायण राणे ५० वर्षे तुरुंगात जातील
संजय राऊत यांनी याआधी नारायण राणे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केलेली आहे. “आम्ही त्यांच्यासारखे (नारायण राणे) डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच आम्ही पक्ष बदलणारे नाही. त्यांनी धाडसाच्या गोष्टी बोलाव्यात का? मी अद्याप त्यांच्याबाबत काहीच बोललेलो नाही. ते आमचे सहकारी होते. त्यांनी धमक्या देऊ नये. धमक्या देत असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. हे मला तुरुंगात काय टाकणार. मी माझ्या पक्षासाठी हिमतीने तुरुंगात गेलो आहे. नारायण राणे यांची आर्थिक प्रकरणं काढली तर ते ५० वर्षे बाहेर येणार नाहीत,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.