कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे देशभरातील विरोधी पक्षांकडून नव्या राजकीय समीकरणांचे आडाखे बांधले जात आहेत. स्थानिक सत्ताधारी भाजपावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना लक्ष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर आता केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, राज ठाकरेंचे किती आमदार-खासदार आहेत? असा खोचक सवालही नारायण राणेंनी केला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
नारायण राणेंना माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरेंच्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला असता नारायण राणेंनी त्यावर टोला लगावला. “महाराष्ट्रात केंद्रातल्या भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांचंच चालतं. राज्यातल्या नेत्यांना कुणी विचारात घेत नाही. मोदी शाह आहेत म्हणून त्यांचं अस्तित्व आहे”, अशा आशयाची टीका राज ठाकरेंनी केल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता नारायण राणेंनी उलटा खोचक प्रश्न करत “राज ठाकरेंचे किती आमदार-खासदार आहेत एकूण महाराष्ट्रात?” अशी विचारणा केली.
राज ठाकरेंना खोचक प्रश्न विचारतानाच नारायण राणेंनी त्यांना सल्लाही दिला. “अशांनी मोठ्या पक्षांवर भाष्य करावं का? आमचे देशात ३०२ खासदार आहेत. महाराष्ट्रात स्वत:चे १०५ आमदार आणि इतर १२ आहेत. आणि या एक आमदार वाल्यानं लोकप्रियतेची भाषा करावी आणि तुम्ही त्यावर चर्चा करावी?” असं नारायण राणे म्हणाले.
“हिंदू कुंभकर्णाचे बाप…”, कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर शरद पोंक्षेंची आगपाखड!
संजय राऊत-उद्धव ठाकरेंनाही टोला
दरम्यान, यावेळी बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाही टोला लगावला. “संजय राऊत काय करतो सध्या? पोपट मेला वगैरे ही भाषा त्याची? पोपट शिवसेनेत होता तेव्हा तो जिवंत होता, भरारी घेत होता. पंखावर काहीतरी घेऊन मातोश्रीत प्रवेश करत होता तेव्हा चांगला होता? आणि आता मेला? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटस आहे. त्यांच्याबद्दल कुणी अपशब्दानं बोलू नये. संजय राऊत, उद्धव ठाकरे सध्या नैराश्यात आहेत. सत्ता गेली म्हणून वेड्यासारखे बडबडत आहेत”, असं नारायण राणे म्हणाले.
“उद्धवना फार दु:ख झालंय म्हणून सगळे येऊन त्यांची भेट घेऊन जातात. हे किती पक्ष आहेत? त्यांचे सगळ्यांचे मिळून ६० खासदारही होत नाहीत. एक ना धड, भाराभर चिंध्या आहेत”, अशी खोचक टीका राणेंनी यावेळी केली.