शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा वाद सुरू आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. १४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटासह संपूर्ण महाराष्ट्राचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूचक विधान केलं आहे.
“ही ब्रेकिंग न्यूज टाका” असं म्हणत राणेंनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कुणाच्या बाजुने लागणार याबाबत भविष्यवाणी केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होऊ घातलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत विचारलं असता, नारायण राणे म्हणाले, “मी ज्योतिष सांगू का? कारण न्यायालयातील प्रकरणांवर मी कधी बोलत नाही. पण उद्धव ठाकरे ज्या चिन्हासाठी भांडत आहेत. ते चिन्ह जाईल. ते चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल. ही टाका ब्रेकिंग न्यूज…” सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच नारायण राणेंनी सूचक विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही विकास केला आहे, मुलं जन्माला घातली नाव देण्याचा अधिकार कोणाला? वडिलांनाच ना? आमच्या विविध योजना महाराष्ट्रात आहेत. काल दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. पंतप्रधानांना बोलावलं, पैसे ते देतात. त्यात चुकीचं काय? अडीच वर्षांत शिवेसेनेने काय केलं? हे त्यांनी सांगावं. मातोश्री सोडून मंत्रालयात अडीच वर्षांत अडीच तास बसले. हे काय मुख्यमंत्री आहेत का?” असा सवालही राणेंनी विचारला.
हेही वाचा- “…तर मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजनांना माझा पाठिंबा”, कट्टर विरोधक एकनाथ खडसेंचं विधान
याशिवाय कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवर भाष्य करताना नारायण राणे म्हणाले, “कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहोत. विरोधक धुळीसारखे उडवणार आहेत. भाजपा ग्रामपंचायत ते लोकसभा सर्व निवडणुका गांभीर्याने घेतो.”