Navneet Rana On Yashomati Thakur : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर चांगलंच राजकारण तापलं. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांच्या विधानावर बोलताना भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे काँग्रेसचे नेते आक्रमक झाले. तसेच अनिल बोंडे यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा बुधवारी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला होता. यावेळी यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच अनिल बोंडे यांच्यावर खोचक टीका केली होती. आता यावरूनच भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “अमरावतीची जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना दिला आहे.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

“अमरावतीत काल पोलीस आयुक्त यांच्या दालनात काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी ठाण मांडून बसले होते. त्यावेळी यशोमती ठाकूर ज्या पद्धतीने बोलत होत्या. खासदार अनिल बोंडे यांच्याबाबत त्या ज्या पद्धतीने बोलत होत्या, एका नेत्याला अशा प्रकारची भाषा शोभत नाही. लोकशाहीमध्ये ज्यांचं त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, एका महिला नेत्याला अशा प्रकारची भाषा शोभत नाही. यशोमती ठाकूर या नेहमी अमरावतीची संस्कृती कोणाला शिवीगाळ करण्याची नाही, असं सांगतात. आता त्यांनी सर्वात आधी हे समजून घ्यावं की, आपलं मत मांडण्याची एक पद्धत असते. पण तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे. तुम्हाला अहंकार कशाचा आहे?”, असा सवाल करत नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा : Balasaheb Thorat : महाविकास आघाडीत मतभेद? मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसचा…”

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, “माझा प्रश्न आहे की, निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. निवडणुकीत विजय किंवा पराभव होत असतो. मात्र, निवडणुकीत यश मिळाल्यानंतर यश पचवता देखील आलं पाहिजे. पण तुम्हाला निवडणुकीत मिळालेलं यश पचवता येत नाही हे लोकांना दिसत आहे. आता येणाऱ्या काळात अमरावतीची जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना दिला आहे.

Story img Loader