Navneet Rana On Uddhav Thackeray : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र, सध्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. या प्रचारांच्या सभेतून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. असे असतानाच भाजपाच्या नेत्या तथा अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेनंतर राडा झाल्याची घटना शनिवारी घडली. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार या गावात नवनीत राणा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनीत राणा यांचं भाषण सुरु असताना काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच यावेळी नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकत काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. “उद्धव ठाकरे हे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे नाहीत, तर जनाब उद्धव ठाकरे झाले आहेत”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

हेही वाचा : ‘खुर्च्या फेकल्या, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न…’, अमरावतीमधील प्रचार सभेतील राड्यानंतर नवनीत राणा यांचे गंभीर आरोप

नवनीत राणा काय म्हणाल्या?

दर्यापूरमधील खल्लार या गावात झालेल्या राड्यासंदर्भात बोलताना नवनीत राणा यांनी म्हटलं की, “ज्या गावात हा प्रकार घडला, ते गाव शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षांचं आहे. आधी व्यासपीठावरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही सभेसाठी व्यासपीठ उभं केलं होतं. मात्र, त्यानंतर त्या सभेला मला उशीर झाला. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सभेसाठी आलेल्या महिला आणि लोकांबाबत अपशब्द बोलत होते. अशा पद्धतीचा व्यवहार त्यांनी केला. हे स्पष्ट आहे की ज्यांचे (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष आहेत आणि आज उद्धव ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, तर जनाब उद्धव ठाकरे झाले आहेत. हे काल स्पष्ट दिसलं”, असा हल्लाबोल नवनीत राणा यांनी केला.

नवनीत राणांनी काय आरोप केले?

“सभेत जवळपास २०० ते २५० अपंग लोक बसलेले होते. ते सर्व मला भेटण्यासाठी आले होते. ज्यावेळी मी सभेत भाषण करत होते. तेव्हा काहींनी वक्तव्य केले. त्यावेळी एवढ्या लांबून देखील अल्ला हू अकबरचे नारे ऐकू येत होते. त्यावेळी त्या ठिकाणी माझे काही कार्यकर्ते होते, ते ऐकत होते. तेव्हा काही चुकीचे शब्दही वापरण्यात आले. यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना शांतता ठेवण्यास सांगितलं. आम्ही शांततेत सभा करून जाणार आहोत, असं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मात्र, सभा संपल्यानंतर मी लोकांना भेटत होते. त्यावेळी मी लोकांशी संवाद साधत होते. तेव्हा तुला मारून टाकू, अशा पद्धतीची धमकी देण्यात आली”, असा आरोप नवनीत राणांनी केला आहे.

“काहींनी खुर्च्या उचलल्या आणि आमच्या लोकांवर फेकल्या. त्यानंतर आमच्या काही लोकांनी मला गाडीत बसवलं. मी नसते तर खल्लार गावातील दोन लोकांचा जीव त्या लोकांनी घेतला असता. एवढंच नाही तर माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्याबरोबर असलेल्या महिला सुरक्षारक्षकांनाही काही खुर्च्या लागल्या. या सर्व प्रकरणावरून हे लक्षात येतं की, जे व्यक्ती आपल्या विचारांसाठी लढत आहेत. जो विचार आपण घेऊन चालत आहोत. आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे जाणारे लोक आहोत”, असंही राणा यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader navneet rana on shivsena uddhav thackeray criticism in amravati campaign rally confusion politics maharashtra vidhan sabha election 2024 gkt