गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डाव्होस दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आधी तिथे करण्यात आलेले करार, त्यांचे आकडे, त्यानंतर करार झालेल्या महाराष्ट्रातील कंपन्या आणि आता या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके किती तास डाव्होसमध्ये होते आणि त्यातले किती तास झोपले? याची चर्चा होऊ लागली आहे. यावरून राजकीय दावे-प्रतिदावे सुरू असतानाच भाजपा नेते निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना खोचक शब्दांत लक्ष्य केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर निलेश राणेंनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
कुठून झाली सुरुवात?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव्होसला जाण्याआधीच महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांवरून विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डाव्होस दौऱ्यादरम्यान तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचे एमओयू केल्याची माहिती देण्यात आली. याच्या आकड्यांवरून वाद सुरू असतानाच यातले काही करार हे महाराष्ट्रातल्याच कंपन्यांशी केल्याचा दावा विरोधकांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा डाव्होस दौरा नेमका यशस्वी ठरला की अपयशी? याची चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी डाव्होस दौऱ्याबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे.
डाव्होसमध्ये ७६ तासांत मुख्यमंत्री फक्त ४ तास झोपले? दीपक केसरकरांच्या दाव्याची चर्चा; म्हणाले…
काय म्हणाले दीपक केसरकर?
दीपक केसरकरांनी एकनाथ शिंदे डाव्होसमधील वास्तव्यात फक्त ४ तास झोपल्याचा दावा केला आहे. “डाव्होस दौऱ्यात हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती, अशा वेळी मुख्यमंत्र्यांचं डाव्होसमध्ये अनुपस्थित राहणं योग्य नव्हतं. हा पंतप्रधान मोदींचा अपमान ठरला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७६ तास डाव्होसमध्ये होते आणि यावेळी ते केवळ चार तास झोपले. ७२ तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले”, असं केसरकर म्हणाले आहेत.
दरम्यान, एकीकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या डाव्होस दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च झाल्याचं सांगत टीका करत असताना निलेश राणेंनी त्यावरून खोचक टोला लगावला आहे. “आदित्य ठाकरेंनी जाहीर करावं की मंत्री असताना डाव्होस दौऱ्यानंतर त्यांनी लंडनमध्ये १० दिवस घालवले की नाही? लंडनमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी कुठलं शासकीय काम हाताळलं?” असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.