भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टोकदार शब्दांत टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे, पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगायची गरज नाही, अशा शब्दांत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर भाष्य करताना निलेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे असे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावं हेच सुचत नाहीये. आणि पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं? हे मला वेगळं सांगायची गरज नाही. अशा पिसाळलेल्या लोकांचं काय करायचं, हे मी सकाळीच सांगितलं आहे. ते ठाकरे आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. त्यांच्याविरोधात काही गोष्टी कडकच घेतल्या पाहिजे.

हेही वाचा- “माझी बहीण आणि पत्नी गाडीत नसती तर…” वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया

“काल संतोष बांगर यांच्यावर गाडीवर अमरावतीत हल्ला झाला. यामुळे ते चांगल्या भाषेत ऐकणार नाहीत, असं दिसतंय. त्यांना फटकेच द्यायला पाहिजे. त्यांना त्याच भाषेत बोललं पाहिजे कारण त्यांना दुसरी भाषा कळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की, आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार राहावं”, असा धमकीवजा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

हेही वाचा- “शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याचा डाव” न्यायालयीन सुनावणीआधीच किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान

खरं तर, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावतीत काही शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. संतोष बांगर आपली बहीण आणि पत्नीसह देवदर्शनाला आले होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी हल्ला केला. “आला रे आला, गद्दार आला”, “५० खोके, एकदम ओके” अशा घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या आहेत. या सर्व घडामोडीनंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या शब्दांत टीकास्र सोडलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader nilesh rane on shivsena chief uddhav thackeray rmm