शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घरावर मंगळवारी मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्या घराच्या अंगणात क्रिकेट स्टम्प, दगड आणि काचेच्या बाटल्या आढळल्या आहेत. या काचेच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल असल्याची माहिती मिळत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात तणाव वाढला असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेचा सविस्तर तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
या प्रकरणानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी भास्कर जाधवांचा एकेरी उल्लेख करत टीकास्र सोडलं आहे. “भास्कर जाधव हा ढोंगी माणूस आहे. त्याने पोलीस संरक्षण वाढवण्यासाठी स्वत:चं हा हल्ला घडवून आणला असेल. त्यांच्या घरात रिकामटेकडे लोकं भरपूर आहेत. दोन्ही मुलं रिकामटेकडेच आहेत. त्यांच्या मुलांनाच गेटबाहेर पाठवून हा हल्ला घडवून आणला आहे” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- बीडच्या पालकमंत्री व्हायला आवडेल का? पंकजा मुंडेचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…
यावेळी निलेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव यांनीच आपल्या घरातील कुणालातरी गेटच्या बाहेर पाठवलं असेल आणि त्यांनाच घराच्या अंगणात अशा गोष्टी फेकण्यास सांगितल्या असतील. त्यांच्या घरावर हल्ला वगैरे झालाच नाही. भास्कर जाधव यांनी स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी हे सर्व घडवून आणलं आहे. पण भास्कर जाधव किती बोगस माणूस आहे, हे कोकणातील लोकांना माहीत आहे, असंही राणे म्हणाले.
निलेश राणे पुढे म्हणाले, “भास्कर जाधव यांनी स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी हे सगळं घडवून आणलं असणार. त्यांनी रात्री कुणालातरी स्वत:च्या कार्यकर्त्यांना असं करायला लावलं असेल. मुळात त्याच्याकडे स्वत:चे कार्यकर्तेच नाहीत. त्याने स्वत:च्या दोन मुलांनाच हे कृत्य करण्यास सांगितलं असेल. हा जो काही प्रकार घडला आहे, त्यानेच घडवला आहे, याला एवढं गांभीर्यानं घ्यायची गरज नाही.”