विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. कश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर कश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर सामाजिक तसेच राजकीय स्तरावर वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आहेत. अनेक राज्यांत हा चित्रपट करमुक्त करण्यात आलाय. दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनीदेखील मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी तरुणांना तिकिटामध्ये खास सवलत दिली आहे.
राणे यांनी कणकवली येथील महाविद्यालयीन तरुण- तरुणींना खास ऑफर दिली असून लक्ष्मी थिएटरवर हा चित्रपट फक्त १०० रुपयांत पाहता येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ च्या शो दरम्यान तिकिटामध्ये ही खास सवलत असेल. या संधीचा जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी फायदा घ्यावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.
याआधी नितेश राणे यांनी हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच भाजपाच्या काही नेत्यांनीही चित्रपट करमुक्त करण्यासाठी राज्य सरकारला निवेदन दिले होते. मात्र राज्य सरकारने ही मागणी फेटाळून लावत लावली होती. उलट केंद्र सरकारने हा चिपत्रट पूर्ण देशातच करमुक्त करावा. असे केले तर कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हा चित्रपट पाहता येईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडले होते.