भारतीय जनचा पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट आणि पंजाबमधील खलिस्तान चळवळीचा उल्लेख करत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते आता तुकडे-तुकडे गँगचे सदस्य झाले आहेत का? असा सवालही नितेश राणेंनी विचारला आहे.
खरं तर, आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात, असे संकेत देण्यात आले आहेत. याच भेटीवरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
अरविंद केजरीवाल- उद्धव ठाकरेंच्या भेटीवरून टीका करताना नितेश राणे म्हणाले, “१९९३ च्या बॉम्बस्फोटाचा कर्ताधर्ता दाऊदचं समर्थन करणाऱ्याबरोबर मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला आहात. आता काल ज्यांनी खलिस्तानचं समर्थन केलं, अशा मुख्यमंत्र्यांच्याही मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते तुकडे तुकडे गँगचे सदस्य झाले आहेत का? असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. संपत्तीचा वारस बनणं सोपं आहे. पण आमच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा हे कधीच बनू शकत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली.