काही दिवसांपूर्वी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी केली होती. या आक्षेपार्ह विधानानंतर नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याच्या कारणातून उदयपूर याठिकाणी कन्हैय्यालाल नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. असाच प्रकार महाराष्ट्रातील अमरावती येथे देखील घडल्याचाही आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएकडून केला जात आहे.
या घटनेनंतर, ४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत याठिकाणी प्रतीक पवार नावाच्या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याने झाल्याचा आरोप भाजपा नेते नितेश राणे यांनी केला आहे. आमच्या लोकांवर असेच हल्ले होत राहिले तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
संबंधित घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नितेश राणे म्हणाले की, “तुमच्या देवी-देवतांबाबत कुणी काहीतरी बोललं असेल, ते तुम्ही विसरायला तयार नसाल, तर हिंदू देव-देवतांची विटंबना होण्याचे जे प्रकार राज्यभर घडतात, वारंवार सोशल मीडियावर हिंदू देवतांचा अपमान केला जातो, ते आम्ही का विसरायचं?” असा सवाल राणे यांनी विचारला आहे.
व्हिडीओ पाहा:
पुढे ते म्हणाले “मला आठवतंय काही आठवड्यांपूर्वी नाशिकमधील एका युवकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्याने शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या घटनेनंतर आम्ही नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटलो होतो. आमच्या असंख्य देवी-देवतांच्या फोटोंची आणि मूर्तींची विटंबना केली जाते. पण आम्ही हिंदू म्हणून लोकशाही पद्धतीने आवाज उठवतो. कुणालाही मारून टाकण्याचे प्रकार महाराष्ट्राने आतापर्यंत ऐकलेत का? तुम्ही तुमच्या देवतांचा झालेला अवमान विसरायला तयार नसाल, तर आम्ही विसरण्याची भूमिका का घ्यावी? शिवलिंगावर तुम्ही घाणेरडे प्रकार कराल, आमच्या लोकांना मारण्यापर्यंत तुमची हिंमत जात असेल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी तिसरा डोळा उघडावा लागेल” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.