अलिबाग- रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार भाजपचाच असावा, सुनील तटकरे उमेदवार नकोच अशी मागणी भाजपच्या जिल्हा कार्यकारणीने सार्वजनिक बाधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. अलिबाग आणि माणगाव येथे झालेल्या भाजपच्या बुथ कार्यकर्ता मेळाव्यात ही मागणी करण्यात आली. यामुळे महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संख्याशास्त्राचा विचार केला तर गेल्या पाच वर्षात रायगड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती कमालीची बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा रायगडमध्ये भाजपची ताकद अधिक आहे. त्यामुळे विद्यमान उमेदवारासाठी जागा सोडण्याचा निकष लावला तर त्याचे विपरीत परिणाम दिसून येऊ शकातात. गेल्या निवडणूकीत सुनील तटकरे यांच्या पाठीशी पाच आमदार आणि एक माजी आमदार होते. आता तशी परिस्थिती राहीलेली नाही. संजय कदम, भास्कर जाधव आता शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटात गेले आहेत. तटकरे यांनी वेगवेगळ्या तडजोडी करतांना अनेकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार नकोच अशी थेट मागणी भाजपचे दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली. शेतकरी आपल्या महेनत घेऊन शेतात भात पिकवतो. त्यासाठी अपार कष्ट करतो, पण पिक जेव्हा तयार होते. तेव्हा काढणीनंतर झोडणीला तो इतरांच्या हातात देत नाही असा दाखला पाटील यांनी यावेळी दिला. पक्षाने नेतृत्वाने याचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस असलेल्या महेश मोहीते यांनीही अशीच यावेळी मांडली. शिवसेनेच्या तिन्ही आमदारांचा सुनील तटकरे पुन्हा खासदार व्हावे असे वाटत नाही. त्यामुळे या मतदारसंघाचा पुढील उमेदवार हा भाजपचाच असला पाहीजे. भाजपचे कार्यकर्ते पाच वर्ष पक्षवाढीसाठी झटतात, पण निवडणूका येतात, तेव्हा तडजोडीमुळे पक्षाला चार पावले मागे यावे लागते. ही कार्यकर्त्यांच्या मनातील मोठी खंत आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कार्यकर्त्यांची मन समजून घ्यावे असे मत भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी मांडले.

रायगडचा पुढचा खासदार भाजपचा असावा ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ही भावना मी पक्षाच्या नेतृत्वाकडे कळविणार आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे कोकण संघटक रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केले. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी मी आज रायगड जिल्ह्यात आलो होतो. पक्षनेतृत्व याबाबत योग्य निर्णय घेईल असा आशावादही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा : तटकरे यांचे विश्वासू सहकारी सुरेश लाड भाजपमध्ये राष्ट्रवादीला धक्का

काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने रायगडच्या लोकसभा मतदारसंघावर जागेवर दावा सांगितला होता. सुनील तटकरे हेच रायगड लोकसभा मतदार संघाचे पुढील उमेदवार असतील हे जवळपास निश्चित होते. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज घेतलेल्या भुमिकेमुळे रायगड जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader oppose sunil tatkare candidature in loksabha election raigad pbs