बीडमधील सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी विधानसभेबाबत मोठं विधान केलं आहे. 2024 साली विधानसभेला पक्षाने तिकीट दिलं तर तयारीला लागणार आहे. मला कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचे नाही. मी कोणासमोर पदर पसरून काही मागणार नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे सडेतोड भाषण केलं आहे.
“माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे. एवढे दिवस मी कधीच यावर बोलले नाही, मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी हा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील, आपण २०२४ च्या तयारीला लागलं पाहिजे,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा – “मी संघर्षाला घाबरत नाही, झुकणार नाही,” पंकजा मुंडेनी व्यक्त केला निर्धार, म्हणाल्या “माझ्यावर पातळी सोडून…”
“गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आपल्यासमोर…”
“काळात प्रवाहाविरोधात ज्या पक्षात कुणीच जात नव्हतं, त्या पक्षात गोपीनाथ मुंडे कमळाचं फुल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले. त्यांचा संघर्ष कमी झाला का? ४० वर्षांच्या राजकारणात केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. हा संघर्ष कमी आहे का? त्या गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आपल्यासमोर आहे,” असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
हेही वाचा – PM मोदींचा उल्लेख करत महादेव जानकर म्हणाले, “पंकजा मुंडेच्या एका…”
“कमळाशिवाय दुसऱ्या बोटाला कधीही स्पर्श केला नाही”
“व्यक्तीपेक्षा संघटन मोठं आहे, त्याच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. संघटन व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. राजा असेल किंवा रंक सर्वांना हा नियम लागू आहे. माध्यमांनी यापुढे कोणत्याही आमदारकीच्या यादीत माझं नावं चालवू नये. 2024 ला पक्षाने तिकीट दिल तर तयारीला लागणार आहे. मला कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचे नाही. आम्ही कमळाशिवाय दुसऱ्या बोटाला कधीही स्पर्श केला नाही,” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.