भाजपा नेत्या पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. यासंदर्भात अनेक तर्क-वितर्कही लावले जात होते. पंकजा मुंडेंनी राहुल गांधींची भेट घेतल्याचेही दावे केले जात होते. मात्र, आज पंकजा मुंडेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते सर्व दावे खोटे असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. आपण पक्ष सोडत नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चा तूर्तास थांबल्या असल्या, तरी या स्पष्टीकरणासोबतच पंकजा मुंडेंनी आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याची मोठी घोषणा यावेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“एखाद्या घटनेविषयीची माहिती एखाद्या समाजाच्या जबाबदार नेत्याकडे आहे आणि तो म्हणतो की मी थोड्या थोड्या वेळाने देतो, तर हा जनतेचा अधिकारभंग नाही का?” असा सवाल यावेळी पंकजा मुंडेंनी केला. “एखाद्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडे जर एखादी माहिती असेल, तर तिचा राजकीय फायदा घेण्यापेक्षा त्या माहितीचा न्यायासाठी उपयोग करून शिक्षा दिली पाहिजे अशी माझी भूमिका आहे”, असंही त्या म्हणाल्या.

“या सगळ्या गोष्टी बघून मी दु:खी झाले आहे. मी रोज बातम्या बघते की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिली नाही. मला वाटतं की उद्या लोकानी पंडित दीनदयाल उपाध्याय व अटलजींची भाजपा राहिली नाही असा विचार करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचं आपलं काम आहे. मी त्या भाजपाच्या संस्कारांमध्ये वाढले आहे. मला जेव्हा काही करायचं असेल, तेव्हा मी टिपेच्या सुरात सांगेन”, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

“मी प्रचंड संभ्रमात आहे”

“या सगळ्या भूमिकांशी प्रतारणा करणाऱ्या भूमिका माझ्या आजूबाजूला असल्यामुळे मी प्रचंड संभ्रमात आहे. मी गेल्या २० वर्षांत सुट्टी घेतलेली नाही. मला एक-दोन महिने सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे”, असं पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषदेत नमूद केलं.

“…तर राजकारणातून बाहेर पडायलाही मागेपुढे पाहणार नाही”

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी आपल्या पहिल्या मुलाखतीचा संदर्भही दिला. “माझी पहिली मुलाखत सुधीर गाडगीळांनी घेतली होती. तेव्हा मी म्हणाले होते की राजकारणात ज्या विचारसरणीला समोर ठेवून मी राजकारणात आले, त्या विचारसरणीशी मला जेव्हा प्रतारणा करावी लागेल, मला चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील, तेव्हा मी राजकारणातून बाहेर पडायलाही मागेपुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत मला एका ब्रेकची आवश्यकता आहे. मी तो ब्रेक घेणार आहे. एक-दोन महिने मी सुट्टी घेणार आहे. जनतेच्या बाबतीत काय घडतंय, यावर विचार करण्याचीही गरज आहे. अंतर्मुख होऊन मी जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे. त्याच वाटेवर मी आहे का, हे तपासून बघण्याची मला गरज आहे”, असं त्या म्हणाल्या.

“मी ब्रेक घेण्याचं यासाठी सांगतेय की कृपा करून कुणी माझ्यासमोर माईक घेऊन प्रतिक्रिया विचारायला येऊ नका. कुणी माझ्याबाबतीत काय म्हणतंय त्यावर बोलणं माझं काम नाहीये. मला जे करायचंय, ते मी करेन. ते फक्त विचारसरणीवर आधारित असेल. या ब्रेकमध्ये मला आजच्या राजकारणावर विचारमंथन करायचं आहे”, असं पंकजा मुंडेंनी यावेळी नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader pankaja munde announced 2 months break from politics pmw
Show comments