लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झालं. पण लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोर जावं लागलं. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला. तर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. मात्र, पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.

यानंतर पंकजा मुंडे यांनी त्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन कुटुंबियाचं सात्वंन केलं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सूचक वक्तव्य केलं. “मी निवडून आले असते तर हिरो झाले असते. पण मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कुणाकडे आहे? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा : “कोणत्याही एक्झिट पोलमध्ये मी जिंकेन असं सागितलं नाही, पण मटका लावणाऱ्यांनी…”, धैर्यशील मानेंचं वक्तव्य चर्चेत

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“निवडणुकीत पराभव झाला म्हणजे मी संपले का? निवडणुकीत पराभव झाला म्हणजे संपले असं होत नाही. मला किती मतदान झालं आहे. या देशात पहिल्या पाचमध्ये मला मते पडली आहेत. ६ लाख ७७ हजार मते पडली आहेत. अजून ३ हजार मते पडली असती तर मी निवडून आले असते. मी निवडून आले असते तर हिरो झाले असते. पण मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

“आता आक्रोश सुरू आहे. पण मी काय उत्तर देणार? आता जे चाललं आहे हे यासाठी चाललं आहे की, २०१९ च्या निवडणुकीत माझा पराभव झाला. पाच वर्ष पंकजा मुंडे यांच्याबरोबर आम्ही (कार्यकर्त्यांनी) वनवास भोगला. आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे माझं आता काही होणार नाही, अशी भावना लोकांची झाली आहे. मला काहीतरी द्या, यासाठी माझी लढाई नव्हती. लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर मला कळलं की मी लोकसभा लढणार आहे. मी लोकसभेची निवडणूक लढवावी हे पक्षाने जाहीर केलं. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील आणि देशाचं चांगलं होईल या भावनेतून मी लोकसभेची निवडणूक लढवली”, असंही त्यांनी म्हटलं.

“आता सगळं सोडून घरी बसायचं असलं तरी विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही. पहिल्यावेळी पाच वर्ष वाट पाहावी लागली, पण आता विधानसभेला फक्त तीन महिने राहिले आहेत. त्यामुळे जीव लावून काम करा आणि इशाऱ्याकडे लक्ष ठेवा. आधी ५ वर्ष वाट पाहावी लागली. आता तीन महिने वाट पाहा”, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.