केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारातून प्रीतम मुंडे यांना वगळण्यात आलं. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी यावर नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही, तर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करत बीड, अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले. राजीनामे दिल्यानंतर आज मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. “माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. त्यामुळे आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत”, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

“मी कुणाला भीत नाही, पण मी आदरही करते. निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. मी माझ्यापेक्षा वयाने मोठं असणाऱ्या व्यक्तींचा अनादर केला नाही. मी निर्भय आहे ते तुमच्याच जीवावर. कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. कोणताही माणूस कोणताही निर्णय घेतो, तो लाभार्थी असतो. मी सगळ्या पक्षांच्या याद्या बघितल्या, तर एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माझ्यासाठी नकोय, तुमच्यासाठी हवंय. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझं ऐका. आपण कष्टाने बनवलेलं घरं का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

संबंधित वृत्त- मला दबाबतंत्र वापरायचं नाही; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नाकारले

आपण कष्टाला घाबरत नाही, कोयता घेऊन कामाला जाऊ

“माझा नेता मोदी… माझा नेता अमित शाह… माझा नेता जे.पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी चांगलं आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. मला माझ्यासाठी काही नकोय. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला भाजपाने अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणं शक्य नाही. मी म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचं नाव आलं, काय बिघडलं? मी कोण आहे… तुम्ही तर प्रोटोकॉलने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला सजवण्याचा प्रयत्न करू नका”, असं पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाल्या.

मला आई आणि बाप अशा दोन्ही भूमिकेतून निर्णय घ्यावे लागतात

“कौरव आणि पांडवातील युद्ध पांडवांनी जिंकण्याचं आणखी एक कारण होतं. कौरवांच्या सैन्यातील लोक मनाने पांडवांसोबत होते आणि शरीराने कौरवांसोबत होते. कळलं का तुम्हाला. त्यांच्या रथावर असलेले सारथीसुद्धा त्यांच्यासोबत नसतील. काळ कधीच थांबत नसतो. तुमचं दुःख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू तुम्ही घरी घेऊन जा. मला काय मिळालं नाही, अशा चिल्लर लढाईत मला पडायचं नाही. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत. तुम्ही सगळे माझे महारथी आहात. काही लोकांनी असं भाष्य केलं की, पक्षाने दिलेलं विसरणार नाही. नेत्यांचे कान भरून मोठं होणारी मी नाही. मला दिलं. चंद्रकांत पाटील महसूलमंत्री झाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. आशिष शेलारांनीही चांगलं वक्तव्य केलं. मला आई आणि बाप अशा दोन्ही भूमिकेतून निर्णय घ्यावे लागतात”, अशी भूमिका पंकजा यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली.

इथे आता राम नाही, असं ज्यादिवशी वाटेल, त्यादिवशी बघू

“आपल्या जीवनातील स्पिरीट असंच ठेवा. मी न बोलताही तुम्हाला कळलं. तुमचंही मला कळलेलं आहे. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. मला संधी मिळाली असती, तर मी भागवत कराड यांच्या शपथविधीलाही गेले असते. ऊसाच्या फडात काम करणाऱ्या माणसाला सभापती बनवलेलं आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या मंत्रिपदापेक्षा मला हे महत्त्वाचं आहे. गरीब माणूस बाजार समितीचा सभापती असल्याचा मला अभिमान वाटतो. वंचितांचा वाली बनण्याचं आपलं स्वप्न आहे. इथे आता राम नाही, असं ज्यादिवशी वाटेल, त्यादिवशी बघू”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Story img Loader