राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठवड्याभरापूर्वी त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात मुंडे यांना दुखापत झाली होती. दरम्यान, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
हेही वाचा >> ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे पुत्र आक्रमक, म्हणाले “…तोपर्यंत कोणी केसालाही धक्का लावू शकणार नाही”
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे नात्याने बहीण-भाऊ असले तरी त्यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. हे भाऊ-बहीण राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बीड, तसेच परळी येथील विकासकामांच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. मात्र हेच राजकीय वैर मागे टाकत पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करताना दिसत आहेत.
हेही वाचा >> हसन मुश्रीफ यांच्या घरावर तब्बल १२ तास छापेमारी! चौकशीत ईडीच्या हाती नेमकं काय लागलं?
धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी ( ३ जानेवारी) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परळीमध्ये अपघात झाला होता. मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून तशी माहिती देण्यात आली होती. मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परत येताना हा अपघात झाला होता. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे अपघाताची घटना घडली होती.
हेही वाचा >> शिक्षक मतदारसंघ निवडणूक : भाजपा-शिंदे गटाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा प्लॅन काय? जयंत पाटील म्हणाले “आम्ही सर्व…”
दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.