बीड: ‘माझ्या नाराजीची चर्चा पुरे झाली. पुढील वेळी पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक आहे. तुम्ही मात्र आता २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागा’, असा संदेश भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी बुधवारी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात समर्थकांसमोर केलेल्या भाषणात दिला. काही दिवसांपूर्वी पक्षनेतृत्वाविरुद्ध आक्रमक भूमिका घेणाऱ्या पंकजा यांनी आपली भूमिका मवाळ केल्याचे यावेळी दिसून आले.
‘माझे काय चुकले? मंत्री म्हणून चांगले काम केले. राज्यभर फिरून पक्षासाठी काम केले नाही का?’, असा थेट प्रश्न पंकजा यांनी विचारला. आता पदाची अपेक्षा करू नका. पक्षाला त्रास द्यायचा नाही, कुठल्याही नेत्याबद्दल बोलायचे नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. मात्र, समर्थकांनी आपापल्या भागात जाऊन २०२४ च्या निवडणुकीसाठी तयारीला लागावे. समर्पणाची ताकद एकदा दाखवून देवू असा संदेशही त्यांनी दिला.
हेही वाचा >>> Dasara Melava 2022: “धिंगाणा घालायचा नाही,” पंकजा मुंडेंनी तंबी दिल्यानंतरही समर्थकांचा गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा झाला. राज्यभरातून मोठय़ा संख्येने समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, आमदार सुरेश धस, मोनिका राजळे यांच्यासह पक्षाचे स्थानिक आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा >>> Dasara Melava 2022: ‘कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच…’, ‘माझी इच्छा…’; नाराजीबद्दल पंकजा मुंडे दसरा मेळ्यात स्पष्टच बोलल्या
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा वारसा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी चालवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हेसुध्दा उपाध्याय यांच्याच विचाराने तयार झालेले नेते भाजपचा वारसा चालवतात. त्या संस्कारातील मी असल्याने वाईट बोलण्याचा संस्कार माझ्यावर नाही. २०१९ च्या निवडणुकीनंतर पक्षाचे अनेक आमदार, खासदार झाले. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना मला काही मिळावे ही अपेक्षा आहे. समाजातील इतरांना मिळाले म्हणून मी काही नाराज होणार नाही. समाजाच्या विस्तारासाठी दिले असेल तर स्वागतच होईल. मात्र समाजाला बांधण्यासाठी दिले जात असेल तर त्याला क्षमा करता येणार नाही. माझा समाज काही शेततळे नाही, समुद्र आहे. त्याला बांधणे शक्य होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा >>> Dasara Melava 2022 : पंकजा मुंडेंचं दसरा मेळाव्यातील सभेत मोठं विधान, “२०२४ ला पक्षाने तिकीट दिलं तर…”
राज्यभर फिरून पक्षासाठी काम केले नाही का? असा प्रश्न करत आता पदाची अपेक्षा करू नका. मिडीयानेही आमदारकीच्या वेळेस माझ्या नावाची चर्चा बंद करावी. मी नाराज असल्याचा विषय आता संपवून टाका. मी कोणासमोर पदर पसरून मागायला जाणार नाही. मी रोज मैदानात असेल, कष्ट करून स्वाभिमानाचे राज्य उभे करू, असे त्या म्हणाल्या.