गेल्या १० दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसले आहेत. त्याआधीपासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता हा मुद्दा राज्यभर तापू लागला आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी लावून धरली आहे. तर दुसरीकडे सरकारकडून वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढण्यात आला. यावरून चर्चेच्या फेऱ्या चालू असताना दुसरीकडे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील आपल्या भूमिकेचा धाराशिवमध्ये बोलताना पुनरुच्चार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मराठा समाजाला शब्द नकोय, त्यांना…”

मराठा समाजाला दिशाभूल करून घ्यायची नाहीये, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. धाराशिवमध्ये त्या माध्यमांशी बोलत होत्या. “मी वारंवार पोटतिडकीनं सांगतेय की मराठा समाजाला शब्द नको आहे. मराठा समाजाला दिशाभूल नको आहे. त्यांना खरं आरक्षण हवं आहे. हे आरक्षण किती बसेल, कसं बसेल याचा आराखडा सरकारकडे असतो. ते विश्वासाने व हिंमतीने त्यांच्याशी चर्चा करून करायला हवं असं मला वाटतं”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

“त्यांनी असं कधीच म्हटलं नव्हती की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. ते म्हणाले होते की आम्हाला आरक्षण द्या. त्यांना वेगळा गट करून आरक्षण दिलंही. पण ते कोर्टात टिकलं नाही. त्यांचं आरक्षण सुरक्षित करण्याचा मार्ग फक्त प्रशासन, शासन व न्यायालयाकडे आहे. त्यांनी तो करावा”, असं त्यांनी नमूद केलं.

“वंशावळीवरूनच हे ठरवता येईल”

दरम्यान, लोकांना एका वर्गातून दुसऱ्या वर्गात टाकण्यासाठी वंशावळी बघूनच निर्णय घेता येईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “मराठा आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी नेहमीच समर्थन दिलं आहे. कुणबी प्रवर्ग ओबीसींमध्ये नको असं म्हणताच येत नाही. ही फक्त दिशाभूल चालू आहे. त्यामुळे मराठा व ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असं वाटू लागतं”, असं पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.

“जो तो वर्ग आपापल्या ठिकाणी आहेच. त्यांना दुसऱ्या वर्गात कसं टाकता येईल? त्यांची वंशावळी बघावी लागेल. तेव्हा कोणती जात लावत होते हे बघावं लागेल. तेव्हा ओबीसींमध्ये नव्हते तर ते टाकणं हे सोपं नाही. ओबीसींचा आरक्षणाला पाठिंबा आहेच. पण कोणता वर्ग असं म्हणेल की आमच्या वर्गात त्यांना आरक्षण द्या. त्यांना अस्वस्थ करून पुन्हा दोन वर्गांमध्ये भांडणं लावून तिसरी माणसं बघत बसणार हे महाराष्ट्राला अजिबात नकोय. महाराष्ट्राला शांतता व स्थैर्य हवं आहे. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजातील वादाचा कोणताही विषय नाही. त्यात स्पष्टता आहे”, अशी स्पष्ट भूमिका पंकजा मुंडेंनी यावेळी मांडली.

सरकारनं मनोज जरांगेंना पाठवला बंद लिफाफा, नेमकं काय ठरलं? अर्जुन खोतकर म्हणतात……

“केंद्र सरकारच्या अडचणी वेगळ्या असतील. कारण त्यांच्याकडे अनेक राज्यांमध्ये याच समस्या आहेत. त्यामुळे या बाबतीत ते संविधान बघून निर्णय घेतील. आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षणापर्यंतचाच विषय आहे. आरक्षण ५० टक्क्यांवर जायचं नसेल, तर त्यांना किती टक्के आरक्षण दिलं जाऊ शकतं हे पाहावं लागेल. ५० टक्क्यांवर आरक्षण न्यायचं असेल, तर तो निर्णय देश पातळीवर घेतला जायला हवा”, असंही त्या म्हणाल्या.

“आत्महत्या करू नका”

दरम्यान, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल मराठा समाजातील तरुणांनी उचलू नये, असं आवाहन पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा केलं आहे. “आत्महत्या करू नका. असं वाटत असेल तर तुम्ही लढवय्ये नाही. तुमची ही लढाई कदाचित तुमच्या पुढच्या पिढीला कामी येईल. तुम्हीच असं करू लागले तर इतरांनी कुणाकडे बघायचं? जीव ओतून आंदोलन करा”, असं त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader pankaja munde on maratha reservation manoj jarange patil hunger strike pmw
Show comments