लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण स्थगित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व्यक्त करून सरकार त्यांच्या मागण्यांचा नक्कीच सकारात्मक विचार करेल. तसेच त्यांना पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. आज भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला पंकजा मुंडे यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणावर भाष्य केले. जर बोगस कुणबी प्रमाणपत्र दिले गेले असेल तर ते रद्द केले पाहीजे, अशी मागणी हाके यांनी केली होती, या मागणीलाही पंकजा मुंडे यांनी पाठिंबा दिला आहे.
लक्ष्मण हाकेंची भूमिका मला भावली
ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या प्रा. लक्ष्मण हाकेंची भाषा, त्यांचे बोलणं, त्यांचे विचार मांडणे, हे सर्व मुद्द्याला धरून आहे. कुणाला ललकारणं, कुणाची बघू म्हणणं किंवा बाह्या सरसावणं ही त्यांची भूमिका नाही. त्यामुळे त्यांचे सालस आंदोलन माझ्यासह सर्वांना भावले, अशीही प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. तसेच हाके आणि वाघमारे यांनी एक प्रतिष्ठा ठेवून त्यांचे मुद्दे मांडल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिले गेले, बाकी कुणी काही बोलत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगून पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
ओबीसी आणि मराठा पूर्वी बहुजन होते. पण आता ओबीसी आणि मराठा भांडण लावण्याचे कारस्थान राज्यात यशस्वी होऊ देऊ नये, असे माननाऱ्या नेत्यांपैकी मी एक आहे. कुठल्याही मंचावर जाऊन दुसऱ्यांना बोलण्याची भूमिका मी घेतलेली नाही. पण आता राज्यातील परिस्थिती विचित्र नक्कीच झाली आहे. यातून राजकीय नेत्यांनी मार्ग काढला पाहीजे. दोन्ही समाजाच्या नेत्यांना एकत्र बसवून त्यांच्यातील वितुष्ट संपविले पाहीजे. शेवटी देशाच्या राज्यघटनेपेक्षा कुणीही मोठा नाही. घटना आणि कायद्यापेक्षा कुणीही आणि कोणताही समाज मोठा नाही, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
गेल्या १० दिवसांपासून ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ केलेले उपोषण लक्ष्मण हाके यांनी आज स्थगित केले. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन यांच्यासह राज्य सरकारचे शिष्टमंडळ हे उपोषण सोडविण्यासाठी जालन्याच्या वडीगोद्री येथे पोहोचले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी बेमूदत उपोषणाचे आंदोलन छेडले होते.