गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाची सातत्याने चर्चा होताना पाहायला मिळत आहे. कधी त्यांच्या नाराजीच्या चर्चा असतात तर कधी त्यांच्यावर राष्ट्रीय स्तरावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीच्या चर्चा असतात. आता पंकजा मुंडेंना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे फडणवीसांनी तशी चर्चा झाली नसल्याचं म्हटलं असताना पंकजा मुंडेंनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय वनवास व दगाफटका…
पंकजा मुंडे सध्या ‘गांव चलो अभियान’ या उपक्रमासाठी बीडच्या गावांमध्ये फिरत आहेत. या उपक्रमादरम्यान एका गावातील जाहीर कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषणादरम्यान मोठं विधान केलं आहे. आपल्यासोबत दगाफटका झाल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
“वनवासात तुम्ही लोकांच्या स्मरणात राहात नाहीत. तो वनवास सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या मनात, हृदयात राहात नाही. मला राजकारणात वनवास झाला. दगाफटका झाला. पण तो कशासाठी झाला? तुम्ही एवढं प्रेम माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला. मग मला तोटा झाला की फायदा झाला? आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्यापेक्षा दहापट जास्त लोक प्रेम करायला लागले, विश्वास ठेवायला लागले. हा माझ्यासाठी झालेला फार मोठा बदल आहे”, असं पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या.
दरम्यान, या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाकडून पंकजा मुंडे यांना राज्यसभा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी “पंकजा मुंडेंशी राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चा झालेली नाही”, अशी प्रतिक्रिया दिली असताना या सर्व चर्चांवर पंकजा मुंडेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
“कोणतीही निवडणूक आली की…”
“गेल्या ५ वर्षांत अशी कोणती निवडणूक आली ज्यात माझं नाव नव्हतं? विधानसभा, राज्यसभा या कोणत्याही निवडणुकीत माझं नाव चर्चेत येतं. गेल्या अनेक वर्षांपासून मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं. त्या हिशेबाने लोक माझं नाव घेतात. आता या तीन पक्षांच्या सरकारमुळे अशी चर्चा आहे की मला मतदारसंघच राहिलेला नाही. त्यामुळे साहजिकच या चर्चा येतात. त्यावर मी काहीही करू शकत नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भाषणानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
पंकजा मुंडे राज्यसभेत जाणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
“..आता त्याला फार उशीर झाला आहे”
दरम्यान, आता आपल्याला कुठे जायला आवडेल, हे सांगायला फार उशीर झालाय, असं त्या म्हणाल्या. “मला कुठे जायला आवडेल या निवडीला आता उशीर झालेला आहे. आता माझ्या लोकांना, जे फक्त बीडमध्ये मर्यादित नाहीत, जे माझ्याकडे उमेदीनं पाहातात त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे. त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले, तर फार मोठी गोष्ट आहे”, असं त्या म्हणाल्या.