बीडमध्ये विनायक मेटे यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर दिसणार आहेत. त्याची जोरदार चर्चा आहे. अशात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर भाष्य केलं आहे. पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्याही चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. अशात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर येत असल्याने चर्चा होते आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस आणि मी एकाच मंचावर येणं ही..

आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहोत. याची चर्चा होते यात काही मोठी गोष्ट नाही. ही चर्चा होते आहे. मला तर याची कल्पनाही नाही की या गोष्टीची चर्चा होते आहे. आमच्या एकत्र येण्याचं इतकं काही महत्त्वाचं नाही. देवेंद्र फडणवीस आधी ज्या कार्यक्रमांसाठी बीड जिल्ह्यात आले होते त्या कार्यक्रमांना मी जाणं अपेक्षितच नव्हतं. आजच्या कार्यक्रमाला मला विनायक मेटेंच्या पत्नीने बोलवलं आहे त्यांचा मला फोन आला होता असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे आधी तीन कार्यक्रमांना येऊन गेले. मात्र त्या कार्यक्रमांना पंकजा मुंडे आल्या नव्हत्या. अशात विनायक मेटेंच्या जयंतीच्या निमित्ताने हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने राजकीय चर्चा घडत आहेत. मात्र या एकत्र एकाच मंचावर येण्याला फार महत्त्व नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

विनायक मेटेंशी असलेले राजकीय मतभेद संपुष्टात

विनायक मेटेंशी असलेले मतभेद संपुष्टात आले आहेत. विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला, त्यांचा अपघात होण्याच्या आठ ते दहा दिवस आधी विनायक मेटेंनी मला फोन केला होता. मला तुमच्याशी बोलायचं आहे असं मला सांगितलं होतं. त्यांच्या बोलण्यातूनच मला हे लक्षात येत होतं की आमच्यात जे काही मतभेद झाले होते ते त्यांना मिटवायचे होते. मात्र त्यांचं आणि माझं बोलणं होऊ शकलं नाही. त्यांच्या अपघाती मृत्यू झाल्यानंतर मला खूपच हूरहूर वाटली की त्यांना नेमकं काय बोलायचं होतं? मात्र आज त्यांच्या कुटुंबाने कार्यक्रम ठेवला आहे त्याला मी जाणं ही संस्कृतीच आहे असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader pankaja munde statement about devendra fadnavis what did she say
Show comments