पिंपरी चिंचवडमध्ये राज्यव्यापी ओबीसी आरक्षण बचाव बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. बैठकीपूर्वी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ओबीसींच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं. वंचितांचं सध्या कुणीच वाली नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. आज मुंडे साहेब असते, तर ते रस्त्यावर उतरले असते अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. या बैठकीला महापौर माई ढोरे, आमदार महेश लांडगे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
“ओबीसींच राजकीय आरक्षण पूर्णतः संपुष्टात आलं आहे. सरकार नवीन होतं, त्यांना काम करण्यासाठी वेळ दिला. पण गेली पावणे दोन वर्षे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलं आहे. शिवाय, येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनामध्ये प्रश्नचिन्ह आणि अंधकार निर्माण करण्याचा निर्णय हे सरकार घेत आहे. एकमेकांना सांभाळून सरकार टिकवणं यापलीकडे कुठलीही भूमिका सरकार जनहितासाठी घेत नाही. केवळ, स्वतः चा हिताचा विचार होत आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात येणं, हा विषय अत्यंत संतापजनक आहे. त्यामुळे येणाऱ्या २६ जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहोत. न्याय मिळाला नाही तर यापेक्षा मोठा लढा देऊ. आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी हे सरकार अपयशी ठरलं आहे”. अशी घणाघाती टीका भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.
Maratha Reservation: “५ जुलैपासून होणारं राज्याचं अधिवेशन चालू देणार नाही”; विनायक मेटेंचा इशारा
दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर त्यांनी आपलं मत नोंदवलं. “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची अनेक वर्षांपासून युती राहिलेली आहे. यामुळे अनेक जणांची प्रगती झाली आहे. त्यामुळं साहजिक आहे, त्यांनी तशी भावना मांडली असेल. प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांच्या या निर्णयाच मी स्वागत करते. कारण दोन्ही पक्षांचं अनेक वर्षांचं नातं आहे.”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी नोंदवली.